संदीप जोशी यांचा राजीनामा; दयाशंकर तिवारी नवे महापौर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:08 AM2020-12-22T04:08:36+5:302020-12-22T04:08:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भाजपने ठरवून दिलेल्या फॉर्म्युल्यानुसार महापौर संदीप जोशी यांनी सोमवारी महापौरपदाचा राजीनामा दिला. पुढील ...

Sandeep Joshi resigns; Dayashankar Tiwari new mayor | संदीप जोशी यांचा राजीनामा; दयाशंकर तिवारी नवे महापौर

संदीप जोशी यांचा राजीनामा; दयाशंकर तिवारी नवे महापौर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : भाजपने ठरवून दिलेल्या फॉर्म्युल्यानुसार महापौर संदीप जोशी यांनी सोमवारी महापौरपदाचा राजीनामा दिला. पुढील १३ महिन्यांसाठी ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी नवे महापौर होणार आहेत. सोबतच उपमहापौर मनीषा कोठे यांनीही राजीनामा दिला. परंतु नवा उपमहापौर अद्याप ठरलेला नाही. पत्रकार परिषदेत राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्याकडे जोशी यांनी आपला राजीनामा सोपविला.

महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संदीप जोशी व दयाशंकर तिवारी यांनी महापौर पदावर दावा केल्याने पक्षाने महापौरपदी प्रत्येकी १३ महिन्यांचा कालावधी वाटून देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार संदीप जोशी यांनी २२ नोव्हेंबर २०१९ रोजी महापौरपदाची सूत्रे स्वीकारली होती. १३ महिन्यांचा कालावधी संपल्याने ठरल्यानुसार त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पुढील १३ महिन्यांसाठी दयाशंकर तिवारी यांची महापौरपदी निवड केली जाणार आहे.

१३ महिन्यापैकी ९ महिने कोविडमध्ये व एक महिना आचारसंहितेत गेला. विशेष म्हणजे ८ फेब्रुवारीपर्यंत जोशी यांचा कार्यकाळ होता. परंतु १९ दिवसांपूर्वी त्यांनी राजीनामा दिल्याने मनपात उलटसुलट चर्चा आहे. दयाशंकर तिवारी यांच्या नेतृत्वात आपल्या कार्यकाळात अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. घोषणा केल्याप्रमाणे यापुढे मनपा निवडणूक लढणार नाही. पक्षात बंडखोरी करणार नाही. पक्ष जी जबाबदारी देईल ती निष्ठावान कार्यकर्ता म्हणून पार पाडणार असल्याचे जोशी म्हणाले. उपमहापौरांचे नाव लवकरच जाहीर करणार असल्याचे भाजपचे शहर अध्यक्ष आ. प्रवीण दटके यांनी सांगितले. यावेळी प्रवीण दटके, मनीषा कोठे, स्थायी समितीचे अध्यक्ष विजय झलके, सत्तापक्षनेते संदीप जाधव, दयाशंकर तिवारी आदी उपस्थित होते.

नवा उपमहापौर कोण?

उपमहापौर १३ महिन्यासाठी राहील, असे ठरले नव्हते. परंतु मनीषा कोठे यांनीही राजीनामा दिला आहे. त्यामुळे नवा उपमहापौर कोण, याची उत्सुकता आहे. ज्येष्ठ नगरसेविका वर्षा ठाकरे, दिव्या धुरडे व संगीता गिऱ्हे यांच्यापैकी एकीची उपमहापौरपदी निवड केली जाणार असल्याची चर्चा आहे.

Web Title: Sandeep Joshi resigns; Dayashankar Tiwari new mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.