रेतीमाफिया : १० महिन्यांत २२.९५ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 11:43 PM2018-11-01T23:43:13+5:302018-11-01T23:44:04+5:30
जिल्ह्यातील सर्वच रेतीघाटांची लिलाव प्रक्रिया रखडली असताना रेतीचा अवैध उपसा आणि वाहतूक यात अलिकडच्या काळात प्रचंड वाढ झाली आहे. गौण खनिजांच्या संवर्धनाची जबाबदारी तरी शासनाने महसूल व खनिकर्म विभागाकडे सोपविली असली तरी, रेतीचोरीला आळा घालण्यात या दोन्ही विभागाला सपशेल अपयश आले आहे. दुसरीकडे, नागपूर ग्रामीण पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेत रेतीमाफियांवर करडी नजर ठेवली. त्यातूनच पोलिसांनी १० महिन्यांत जिल्ह्यातील २२ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कारवाई करीत अवैध रेतीवाहतूक प्रकरण्ी १५८ गुन्हे दाखल केले असून, ३१७ जणांना अटक केली. शिवाय, त्यांच्याकडून तब्बल २२ कोटी ९५ लाख ७० हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाई करणाऱ्यांमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आघाडीवर आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यातील सर्वच रेतीघाटांची लिलाव प्रक्रिया रखडली असताना रेतीचा अवैध उपसा आणि वाहतूक यात अलिकडच्या काळात प्रचंड वाढ झाली आहे. गौण खनिजांच्या संवर्धनाची जबाबदारी तरी शासनाने महसूल व खनिकर्म विभागाकडे सोपविली असली तरी, रेतीचोरीला आळा घालण्यात या दोन्ही विभागाला सपशेल अपयश आले आहे. दुसरीकडे, नागपूर ग्रामीण पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेत रेतीमाफियांवर करडी नजर ठेवली. त्यातूनच पोलिसांनी १० महिन्यांत जिल्ह्यातील २२ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कारवाई करीत अवैध रेतीवाहतूक प्रकरणी १५८ गुन्हे दाखल केले असून, ३१७ जणांना अटक केली. शिवाय, त्यांच्याकडून तब्बल २२ कोटी ९५ लाख ७० हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाई करणाऱ्यांमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आघाडीवर आहे.
संपूर्ण विदर्भात वैनगंगा आणि कन्हान नदीच्या रेतीला विशेष मागणी आहे. त्यामुळे रेतामाफियांनी जिल्ह्यातील सावनेर, पारशिवनी, कामठी व मौदा तालुक्यातील वाहणाऱ्या कन्हान नदीला लक्ष्य केले. जिल्ह्यातील रेतीघाटांचा लिलाव करण्यात न आल्याने रेतीचा अवैध उपसा आणि वाहतुकीचे प्रमाणही प्रचंड वाढले. महसूल विभाग या रेतीचोरीला आळा घालण्यात अपयशी ठरल्याने तसेच खनिकर्म विभाग याकडे लक्ष द्यायला तयार नसल्याने याला आळा घालण्याची जबाबदारी ही नागपूर ग्रामीण पोलिसांनी समर्थपणे पार पाडली.
नागपूर ग्रामीण पोलिसांनी १ जानेवारी २०१८ ते ३१ आॅक्टोबर २०१८ या १० महिन्यांच्या काळात जिल्ह्यातील २२ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कारवार्इंचा सपाटा लावला. त्यात त्यांनी जानेवारी ते जुलै या सात महिन्यांमध्ये रेतीचा अवैध उपसा आणि वाहतूक प्रकरणी ८८ गुन्हे नोंदवित १४३ जणांना अटक केली. शिवाय, त्यांच्याकडून या काळात ५ कोटी १५ लाख ६८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आॅगस्ट ते आॅक्टोबर या तीन महिन्यांत कारवाईचे प्रमाण वाढले. या काळात ७० गुन्हे दाखल करण्यात आले असून, १७१ जणांना अटक करण्यात आली. शिवाय, त्यांच्याकडून एकूण १७ कोटी ८० लाख ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अटकेतील आरोपींमध्ये ट्रक, टिप्पर व जेसीबी चालक व मालकांचा समावेश असून, जप्त केलेल्या मुद्देमालांमध्ये या वाहनांसह हजारो ब्रास रेतीचा समावेश आहे.
अधिकाऱ्यांवर जीवघेणे हल्ले
रेतीच्या चोरीतून जिल्ह्यात एकीकडे टोळीयुद्धाची शक्यता बळावली आहे तर, रेतीमाफियांवर पोलीस वगळता कुणाचाही अंकुश नसल्याने त्यांनी पोलीस व महसूल विभागांच्या अधिकाऱ्यांवर जीवघेणे हल्लेही केले आहेत. काही वर्षांपूर्वी पोलीस उपअधीक्षक मंगेश शिंदे यांच्या सरकारी वाहनाला धडक देण्याची घटना पारश्यिावनी तालुक्यात घडली होती. शिवाय, मंगळवारी (दि. ३०) उमरेडचे तहसीलदार प्रमोद कदम आणि नायब तहसीलदार योगेश शिंदे यांच्यावरही रेतीमाफियांच्या हस्तकांनी जीवघेणा हल्ला केला. परंतु, या हल्ल्यांमध्ये हे अधिकारी सुदैवाने बचावले.
स्थानिक गुन्हे शाखा आघाडीवर
जिल्ह्यात आजवर करण्यात आलेल्या कारवार्इंमध्ये सर्वाधिक ८० टक्के कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केल्या आहेत. या पथकाने सर्वाधिक कारवाई खापरखेडा, कन्हान, मौदा, पारशिवनी, उमरेड व त्याखालोखाल भिवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत केल्या आहेत. जिल्ह्यात रेती उपशावर बंदी असल्याने वैनगंगा नदीची रेती ही मौदा - नागपूर व गडचिरोली - भिवापूर - उमरेड - नागपूर या मार्गांनी सर्वाधिक केली जात आहे.