संगमसावंगा ते नागपूरचे ‘वैशाली वन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 12:37 AM2020-09-23T00:37:47+5:302020-09-23T00:40:47+5:30
कुदळ मारीन तेथे झरा फोडीन... अशी वृत्ती खूप कमी लोकांची असते आणि म्हणूनच अशांना प्रज्ञावंत म्हटले जाते. प्रज्ञावंतच, कारण त्यांच्या अस्तित्वाची आभा सगळ्यांना सामावून घेत असते. प्रा. डॉ. भाऊ लोखंडे यांचा हा प्रवासही असाच होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुदळ मारीन तेथे झरा फोडीन... अशी वृत्ती खूप कमी लोकांची असते आणि म्हणूनच अशांना प्रज्ञावंत म्हटले जाते. प्रज्ञावंतच, कारण त्यांच्या अस्तित्वाची आभा सगळ्यांना सामावून घेत असते. प्रा. डॉ. भाऊ लोखंडे यांचा हा प्रवासही असाच होता. जन्मगाव संगमसावंगा ते नागपूरचे ‘वैशाली वन’, या प्रवासात त्यांच्यातील ज्ञानगंगा सतत प्रवाहित होत होती आणि या ज्ञानगंगेच्या वाटेत आलेल्या प्रत्येक पांथस्ताची तहान भागत होती.
भाऊंचा जन्म मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील सौंसर तालुक्यात असलेल्या संगमसावंगा या गावात झाला. जंगलाने वेढलेल्या या गावात अधेमधे वाघोबांचे दर्शन सामान्य बाब होती. वाघाच्या दाढेत शिरून सागवान आणले आणि गावातील हे घर बांधले... अशी रंजक पण वास्तवकथा आई त्यांना नेहमी सांगत असे. घरी सावकारी होती पण समाजसेवी वृत्तीने वडिलांना ती जमली नाही आणि सावकारीची सगळी कागदपत्रे जाळून, ज्याचे त्याला परत करून ते मोकळे झाले होते. घरात हातमागाचा अनुभव असल्याने मोठे बंधू भीमराव नागपूरला एम्प्रेस मिलमध्ये लागले आणि संगमसावंगा येथील लोखंडे कुटुंबीयांचे बिºहाड नागपूरला पाचपावली पोलीस ठाण्याच्या मागे असलेल्या कुºहाडकरपेठेत हलले. येथे कुटुंबाचा रहाटगाडा चालण्यासाठी आईने घेतलेले परिश्रम लहानग्या भाऊंनी बघितले. संत्रा मार्केटमध्ये तणसाच्या गाठोड्यावर झोपवून संत्र्याच्या पेट्या उचलताना आईची होणारी तगमग त्यांनी अनुभवली. येथेच कर्मवीर शिंदे शाळेत भाऊ चौथ्या वर्गात उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले. त्यांची गुणवत्ता बघून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या फत्थूजी पाटील या स्वयंसेवकाने त्यांना हेरले आणि पाचव्या वर्गात नवयुग शाळेत प्रवेश मिळवून दिला. संघाची शाखा, शाळेचा अभ्यास आणि शाळेतील हेडमास्तर शि.वि. वाटवे, गो.वा. लाभे, प्र.दे. कोलते, रामभाऊ जोशी, गणपतराव वैद्य, शशिकला मांडे, काळे या शिक्षकांच्या संस्कारावर भाऊंची पुढची वाटचाल सुरू झाली. याच शाळेत भाऊंना संस्कृतची गोडीही लागली. दरम्यान आजारी असलेल्या वडिलांचा मृत्यू झाला. याच काळात १९५२ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना बघण्याचा योग त्यांना आला. नागपुरात त्यांची सभा लष्करीबागेत होती आणि ते माऊंट हॉटेलमध्ये थांबले होते. येथे बाबासाहेबांशी भेट आणि छोटेखानी गप्पाही झाल्या. पुढे १९५६ मध्ये बाबासाहेबांना दीक्षाभूमीत डोळा भरून बघण्याचा योग आला.
त्यावेळी भाऊ सातवीत होते. पुढे मॅट्रिकमध्ये उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर मॉरिस कॉलेजमध्ये पुढच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला आणि कर्तृत्वाची दिशाच बदलली. प्री युनिव्हर्सिटीला ते मेरिट आले आणि नंतर महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले आणि विद्यार्थी चळवळीला वेग आला. भाऊ रिपब्लिकन स्टुडन्ट फेडरेशनचे संस्थापक कोषाध्यक्ष झाले. फेडरेशनच्या माध्यमातून अनेक आंदोलने झाली. ओमप्रकाश नेटा या दलित विद्यार्थ्याच्या खून प्रकरणात फेडरेशनने त्यांच्या नेतृत्वात काढलेल्या मोर्चात २५ हजारावर विद्यार्थी सहभागी झाले होते. कुºहाडकार पेठेतील घर चळवळ आणि कार्यकर्त्यांनी फुलून आले. पुढे त्यांनी पाली प्राकृत विषयात एम.ए. केले आणि एससीएस गर्ल्स स्कूलमध्ये नोकरी केली. ‘मराठी संत साहित्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव’ या विषयावर पीएच.डी.चे संशोधन केले. मॉरिस कॉलेजमध्ये नोकरी केली. या काळात भाऊंचे बुद्धनगरातील घर संशोधनात गढून गेले होते. दरम्यान, रत्नमाला गजभिये यांच्याशी त्यांचा विवाह झाला. संशोधन, लेखन, अध्यापन, भाषणे, चळवळ आणि सोबत संसार असा प्रवास एकसाथ सुरू झाला. १९७६ च्या सुमारास भाऊ पंजाब नॅशनल बँकेजवळच्या कश्मीर गल्लीतील वर्मा बिल्डिंगमध्ये राहायला आले. येथेच ‘निकाय’ या त्रैमासिकाचा जन्म झाला. त्यांचा पीएच.डी.चा शोधप्रबंध वाचून पु.ल. देशपांडे यांनी निकायसाठी दहा हजार रुपये बक्षीस दिले. याच घरात असताना ते नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर पाली प्राकृत विभागात लेक्चरर म्हणून रुजू झाले. याच घरात विपुल लेखन, संशोधन, निकाय त्रैमासिकाचे विचारमंथन, थेरगाथा-थेरीगाथा-चार आर्यसत्ये-उदान या चार पुस्तकांचा जन्मही झाला. १९८६ नंतर भाऊ मॉडेल टाऊनमधल्या ‘जेतवन’ या घरात आले. मात्र, त्यांच्या वैशाली नावाच्या मुलीचा करुण अंत या घराने बघितला आणि वैशालीच्या गोड आठवणींचा खजिना म्हणून या घराचे नामकरण ‘वैशालीवन’ असे झाले. महाकवी अश्वघोष विरचित ‘बुद्धचरित्र’ हा गं्रथ त्यांनी वैशालीच्या स्मृतीला अर्पण केला. हे घर पुढे वैचारिक क्रांतीचे केंद्रच ठरले. विविध साहित्याचा जन्म, विविध सेवाकार्ये, विविध संघटनांचे नेतृत्व असा सारा गोतावळा या घराने बघितला आहे. देश-विदेशात येथून त्यांनी आपल्या वक्तृत्वाची छटा जगावर उमटवली. संगमसावंगा ते वैशालीवन या प्रवासात भाऊंच्या प्रज्ञेचा स्पर्श प्रत्येक आगंतुकाला घेता आला.