बांधकामावर मजुरी, घरोघरी धुणीभांडी करणारी संगीता बनली आत्मनिर्भर

By मंगेश व्यवहारे | Published: April 24, 2023 11:22 AM2023-04-24T11:22:58+5:302023-04-24T11:23:32+5:30

कचरा संकलनातून रोजगार निर्मिती : अप्रत्यक्षरीत्या शेकडो महिलांना देते रोजगार

Sangeeta, who worked as a construction worker and washed dishes from house to house, became self-sufficient | बांधकामावर मजुरी, घरोघरी धुणीभांडी करणारी संगीता बनली आत्मनिर्भर

बांधकामावर मजुरी, घरोघरी धुणीभांडी करणारी संगीता बनली आत्मनिर्भर

googlenewsNext

मंगेश व्यवहारे

नागपूर : गरिबी, कुटुंबाची जबाबदारी, शिक्षणाचाही फारसा गंध नसल्याने मिळेल ते काम करून कुटुंबाचे भरणपोषण करण्यासाठी कधी रस्त्याच्या बांधकामावर मजुरी केली, घरोघरी धुणीभांडी केली, घराघरांतून भंगार गोळा केला. हे काम करीत असताना एक मार्गदर्शक मिळाला अन् जगण्याची दिशाच बदलली. स्वाभिमानाने हक्काचा व्यवसाय थाटला, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे शेकडो महिलांना रोजगार दिला. आज मालक म्हणून मोठ्या विश्वासाने व्यवसाय सांभाळत आहे. काचीपुऱ्यात राहणाऱ्या या महिलेचे नाव आहे संगीता रामटेके. स्वच्छ असोसिएशनच्या मार्गदर्शनातून महापालिकेच्या मदतीने संगीता रामटेके यांनी स्वत:चे अस्तित्व निर्माण केले आहे.

नागपूर महापालिकेने स्मार्ट स्वच्छ सिटीच्या दिशेने वाटचाल करीत असताना वेगवेगळे उपक्रम राबविले. महापालिकेने दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजनेंतर्गत कचरा संकलनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीचा उपक्रम महिला बचत गटांपुढे मांडला. शहरातील सहा झोनमध्ये महिला बचत गटांना एमआरएफ सेंटर (मटेरियल रिसायकलिंग फॅसिलिटी) उपलब्ध करून दिले. यातील एक सेंटर संगीता रामटेके यांच्या सावित्री महिला बचत गटाला मिळाले. धरमपेठ झोनअंतर्गत एका जागेवर हे सेंटर उभे झाले. धरमपेठ झोन अंतर्गत येणाऱ्या वस्त्यांमधील घरातून निघणारा कचरा संकलित करून एमआरएफ सेंटरवर आणला जातो. तेथे कचऱ्याचे वर्गीकरण करून वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये रिसायकलिंगसाठी तो पाठविला जातो. कचरा संकलन, ट्रान्सपोर्टेशन, वर्गीकरण, रिसायकलिंगसाठी कंपन्यांच्या पाठविण्याचे काम संगीता रामटेके या करतात. कचरा संकलनासाठी त्यांनी घरकाम करणाऱ्या, बांधकामावर मजुरी करणाऱ्या महिलांना, रुग्णालयातील वॉर्डबॉय एकत्र केले.

एखाद्याच्या घरी कचरा निघाल्यास त्या महिला संगीताला सांगतात. संगीता त्यांना कमिशनच्या रूपात पैसे देतात. संगीता यांच्याकडे माल वाहतूक करणाऱ्या दोन गाड्या आहे. त्या स्वत: गाडी चालवितात. कचरा संकलन करतात, त्या एमआरएफ सेंटरमध्ये आणतात. एमआरएफ सेंटरमध्ये काम करणाऱ्या महिला कचऱ्याचे वर्गीकरण करतात. या कामात त्या सकाळी ९ पासून रात्री १२पर्यंत व्यस्त असतात.

कचरा घेतात आणि वृक्षही भेट देतात

ज्या घरातून त्यांना मोठा भंगार मिळतो. भंगाराच्या मोबदल्यात त्यांना पैसे देतात आणि एक वृक्षही भेट देतात. घरात कचऱ्याच्या स्वरूपात पडलेल्या चपला, जोडे, कपडे, प्लॅस्टिक, लोखंड, चहाचे कागदी कप, पेपर रद्दी असे सर्व त्या खरेदी करतात. भंगाराच्या रूपात आलेल्या कपड्यातून बचत गटाच्या माध्यमातून पिशव्या शिवून घेतात. धरमपेठ झोन अंतर्गत येणाऱ्या वस्त्यांमध्ये त्या चांगल्याच प्रसिद्ध आहे. त्यांच्या या कामासाठी राज्य सरकारने त्यांना हिरकणी पुरस्काराने सन्मानित केले आहे.

महापालिकेच्या मदतीने, स्वच्छ असोसिएशनच्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाले आहे. हा व्यवसाय नसून शहरासाठी माझ्या हातून घडत असलेली छोटी सेवा आहे. त्यातून महिलांना रोजगार मिळाल्याचा आनंद आहे. मी खूप समाधानी असून, मला स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग मिळाला आहे.

- संगीता रामटेके, सदस्य, सावित्री महिला बचत गट

Web Title: Sangeeta, who worked as a construction worker and washed dishes from house to house, became self-sufficient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.