विस्ताराबाबत संघ ‘दक्ष’, वर्षभरातच शाखांमध्ये १० टक्क्यांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2022 07:00 AM2022-03-12T07:00:00+5:302022-03-12T07:00:07+5:30

Nagpur News संघस्थापनेला शंभर वर्ष पूर्ण होणार असल्याने २०२५ पर्यंत एक लाखाहून अधिक ठिकाणी शाखा सुरू करण्याचा संघाचा मानस आहे.

Sangh 'Daksh' about expansion, 10% increase in branches throughout the year | विस्ताराबाबत संघ ‘दक्ष’, वर्षभरातच शाखांमध्ये १० टक्क्यांची वाढ

विस्ताराबाबत संघ ‘दक्ष’, वर्षभरातच शाखांमध्ये १० टक्क्यांची वाढ

Next
ठळक मुद्देदेशभरात शाखांची संख्या पहिल्यांदाच ६० हजारांच्या पुढे १० वर्षांत २० हजारांहून अधिक शाखांची सुरुवात

योगेश पांडे

नागपूर : संपूर्ण देशभरात संघशाखांचा विस्तार व्हावा, यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. संघस्थापनेला शंभर वर्ष पूर्ण होणार असल्याने २०२५ पर्यंत एक लाखाहून अधिक ठिकाणी शाखा सुरू करण्याचा संघाचा मानस आहे. कोरोनाचा कालावधी असतानादेखील मागील वर्षभरात देशभरात संघाच्या शाखांमध्ये सुमारे १० टक्क्यांची वाढ झाली आहे.

मार्च २०१९ मध्ये संघाच्या ५९ हजार २६६ शाखा होत्या. कोरोनामुळे शाखा बंद झाल्या होत्या व वर्षभर अनेक ठिकाणी प्रत्यक्ष शाखा भरल्याच नाही. मार्च २०२१ मध्ये देशभरात संघ शाखांचा आकडा घटून ५५ हजार ६५२ वर आला. परंतु संघाने वर्षभरातच शाखावाढीवर भर दिला व सद्यस्थितीत देशभरात ६० हजार ९२९ शाखा भरत आहेत. वर्षभरातच शाखांचा आकडा ५ हजार २७७ ने वाढला.

संघाच्या शतक वर्षपूर्तीनिमित्त कार्यविस्तारावर भर आहे. संघ स्थान आणि शाखांची संख्या वाढीस लागावी, यासाठी संघाकडून सातत्याने विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येत असल्याचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी स्पष्ट केले.

मासिक व साप्ताहिक मिलनातदेखील वाढ

व्यावसायिक व नोकरदारांना अनेकदा कामामुळे दैनंदिन शाखेत जाणे शक्य होत नाही. त्यामुळे साप्ताहिक मिलनाच्या माध्यमातून संघाशी जुळून राहण्याकडे अनेकांचा कल दिसून येत आहे. २०१९ मध्ये १७ हजार २२९ ठिकाणी साप्ताहिक मिलन सुरू होते. २०२१ मध्ये हा आकडा १८ हजार ५५३ वर गेला व सद्यस्थितीत २० हजार ६८१ ठिकाणी साप्ताहिक शाखा भरतात.

९० टक्के शाखा युवकांच्याच

वेगवेगळ्या वयोगटाचा विचार केल्यास, शालेय ते महाविद्यालयीन विद्यार्थी व ४० वर्षांखालील लोकांच्या शाखाांची टक्केवारी सुमारे ९० टक्के इतकी आहे.

दशकभरात वेगाने वाढ

२०१२ नंतर संघाने विस्तारावर वेगाने भर दिला. विशेषत: जिथे संघाचा प्रभाव नव्हता, त्या भागांवर लक्ष केंद्रित केले. २०१२ साली देशात ४० हजार ८९१ ठिकाणी शाखा होत्या. त्यात दशकभरात २० हजार ३८ ने वाढ झाली आहे. दोन वर्षांत एक लाखापर्यंत शाखांची संख्या जाईल, अशी माहिती संघ पदाधिकाऱ्यांनी दिली.

 

Web Title: Sangh 'Daksh' about expansion, 10% increase in branches throughout the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.