संघात इन्सेंटिव्ह मिळत नाहीत : मोहन भागवत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 01:10 AM2018-06-17T01:10:45+5:302018-06-17T01:10:45+5:30
साधारणपणे जेथे काही मिळत नाही तेथे लोक जात नाहीत. संघात येण्यासाठी कुठलेही इन्सेंटिव्ह मिळत नाही. पण आपले सर्वस्व गमावण्यासाठी लोक संघात येत आहेत व संघ वाढत आहे. हेच आधारधन आहे. व्यक्ती अनेक कारणांनी संघाशी जुळते. नंतर ती स्वयंसेवक बनते व जीवनभर उत्तम बनण्याचा प्रयत्न करते, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
पसर््िास्टंट सिस्टीम्स लि. च्या सौजन्याने श्री महालक्ष्मी प्रॉडक्शन नागपूर निर्मित ‘हम करे राष्ट्र आराधन’ या नाटकाचा प्रयोग शनिवारी सायंकाळी कवि कुलगुरू कालिदास सभागृहात सादर करण्यात आला. यावेळी डॉ. मोहन भागवत यांच्यासह पर्सिस्टंटचे एचआर हेड समीर बेंद्रे, महानगर संघ चालक राजेश लोया, नाटकाचे लेखक अविनाश घांगरेकर उपस्थित होते. यावेळी डॉ. भागवत म्हणाले, आम्ही संघाचे अभिन्न अंग आहोत. राष्ट्र आराधना हा शब्द बुद्धीतून नाही तर हृदयातून आलेला आहे. मी क्रांतीतून असे म्हणणार नाही. कारण क्रांती ही काही प्रमाणात थोपवली जाते. संघ कोणतीच गोष्ट थोपवू इच्छित नाही. खूप विचारविमर्श करून संघ स्थापनेची घोषणा झाली. आपला देश विश्वगुरू बनण्यासाठी समाजाला योग्य विचाराने रस्ता दाखविण्याचे काम संघ करीत आहे. या नाटकाच्या माध्यमातून समाजाला संघाचा परिचय होईल. स्वयंसेवकांनाही चिंतनाची प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यानंतर डॉ. मोहन भागवत यांनी उपस्थित राहून संपूर्ण नाटक पाहिले. ‘हम करे राष्ट्र आराधन’ या नाटकात संघाची स्थापना कोणत्या परिस्थितीत व कशासाठी करण्यात आली इथपासून ते संघाची ध्येय धोरणे, शाखांचा विस्तार स्वातंत्र्य संग्रामात संघाचे स्थान आदी विषयांवर प्रकाश टाकण्यात आला. संघाचे संस्थापक डॉ. केशव हेडगेवार यांनी संघ स्थापनेसाठी केलेले परिश्रम व संघाच्या विस्तारासाठी उपसलेले कष्ट यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. हेडगेवार यांच्यानंतर गोळवलकर गुरुजी यांनी संघाची धुरा कशी यशस्वीरीत्या सांभाळली यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी संघाला दिलेल्या भेटीचे प्रसंगही यात अधोरेखित करण्यात आले आहे. महात्मा गांधींच्या हत्येनंतर संघावर आलेले निर्बंध, १९४८ मध्ये पाकशी झालेल्या युद्धात स्वयंसेवकांनी मदतीसाठी घेतलेला पुढाकार व काश्मीरच्या विलिनीकरणात संघाने दिलेले योगदान या सर्वबाबींवर या नाटकाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला.