विस्ताराबाबत संघ ‘दक्ष’, कोरोनानंतर तीनच वर्षांत देशातील शाखांमध्ये ३१ टक्क्यांनी वाढ
By योगेश पांडे | Published: March 16, 2024 12:21 AM2024-03-16T00:21:27+5:302024-03-16T00:21:54+5:30
संघस्थानांमध्येही वाढ : देशातील ९९ टक्के जिल्ह्यांपर्यंत संघाचा थेट संपर्क
नागपूर : स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण होणार असल्याने २०२५ पर्यंत एक लाखाहून अधिक ठिकाणी शाखा सुरू करण्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भर देण्यात येत आहे. कोरोनानंतर तीनच वर्षांत देशपातळीवर संघाच्या शाखांमध्ये जवळपास ३१ टक्क्यांनी वाढ झाली असून पुढील दोन वर्षांत याच दराने वाढ करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मागील तीन वर्षांतील वाढीचा आकडा हा आतापर्यंतची ही सर्वात मोठा ठरला आहे.
मार्च २०१९ मध्ये संघाच्या ५९ हजार २६६ शाखा होत्या. कोरोनामुळे शाखा बंद झाल्या होत्या व वर्षभर अनेक ठिकाणी प्रत्यक्ष शाखा भरल्याच नाही. मार्च २०२१ मध्ये देशभरात संघ शाखांचा आकडा घटून ५५ हजार ६५२ वर आला. २०२२ मध्ये ही संख्या ६० हजार ११७ वर पोहोचली. २०२३ मध्ये ६८ हजार ६५१ जागांवर शाखा भरत होत्या. मात्र, संघाने शाखावाढीवर विशेष भर दिला असून सद्य:स्थितीत देशभरात ७३ हजार ११७ शाखा भरत आहेत. तीन वर्षांत १७ हजार ५६५ तर वर्षभरात शाखांचा आकडा ४ हजार ४६६ ने वाढला. संघाच्या शतक वर्षपूर्तीनिमित्त कार्यविस्तारावर भर आहे. संघ स्थान आणि शाखांची संख्या वाढीस लागावी, यासाठी संघाकडून सातत्याने विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येत असल्याचे सहसरकार्यवाह डॉ.मनमोहन वैद्य यांनी स्पष्ट केले.
साप्ताहिक मिलन शाखांमध्ये ६० टक्क्यांनी वाढ
व्यावसायिक व नोकरदारांना अनेकदा कामामुळे दैनंदिन शाखेत जाणे शक्य होत नाही. त्यामुळे साप्ताहिक मिलनाच्या माध्यमातून संघाशी जुळून राहण्याकडे अनेकांचा कल दिसून येत आहे. २०१९ मध्ये १७ हजार २२९ ठिकाणी साप्ताहिक मिलन सुरू होते. २०२२ मध्ये हा आकडा २० हजार ८२६ वर गेला तर २०२३ मध्ये २६ हजार ८७७ साप्ताहिक शाखा भरत होत्या. आता हा आकडा २७ हजार ७१७ वर गेला आहे. २०१९ च्या तुलनेत पाच वर्षांतच साप्ताहिक मिलन शाखांमध्ये ६०.८७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
९० टक्के शाखा युवकांच्याच
वेगवेगळ्या वयोगटाचा विचार केल्यास, शालेय ते महाविद्यालयीन विद्यार्थी व ४० वर्षांखालील लोकांच्या शाखांची टक्केवारी सुमारे ९० टक्के इतकी आहे. तरुणांना जोडण्यासाठी वर्षभरात सामाजिक समसरता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण मोहिमेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न राहणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यादृष्टीने विविध प्रशिक्षणदेखील देण्यात येत आहेत.
१२ वर्षांत वेगाने वाढ
२०१२ नंतर संघाने विस्तारावर वेगाने भर दिला. विशेषत: जिथे संघाचा प्रभाव नव्हता, त्या भागांवर लक्ष केंद्रित केले. २०१२ साली देशात ४० हजार ८९१ ठिकाणी शाखा होत्या. त्यात मागील १२ वर्षांत ३२ हजार २२६ ने वाढ झाली आहे. ही टक्केवारी ७८.८० टक्के इतकी आहे.
अशी झाली शाखावाढ
वर्ष : शाखासंख्या : साप्ताहिक शाखा
२०१९ : ५९,२६६ : १७,२२९
२०२१ : ५५,६५२ : १८,५५३
२०२२ : ६०,११७ : २०,८२६
२०२३ : ६८,६५१ : २६,८७७
२०२४ : ७३,११७ : २७,७१७