विशिष्ट प्रणाली नव्हे तर साधनेतून संघ कार्यकर्ता घडतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 01:29 AM2017-08-25T01:29:38+5:302017-08-25T01:30:12+5:30
समर्पित भावनेने जगणारे अनेक कार्यकर्ते संघ परिवारात दिसून येतात. आजच्या कालखंडात अशा व्यक्ती नेमक्या कुठल्या ‘मेथडॉलॉजी’तून घडतात असे प्रश्न विचारण्याचे प्रमाण वाढले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : समर्पित भावनेने जगणारे अनेक कार्यकर्ते संघ परिवारात दिसून येतात. आजच्या कालखंडात अशा व्यक्ती नेमक्या कुठल्या ‘मेथडॉलॉजी’तून घडतात असे प्रश्न विचारण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र नि:स्वार्थ भावनेतून सेवाकार्य करणाºया व्यक्ती घडविण्याची कुठलीही प्रणाली संघाकडे नाही. अशा प्रणालीतून नव्हे तर स्वत:च्या पुढाकाराने केलेल्या निरंतर साधनेतूनच कार्यकर्ता घडतो. राष्ट्रसेविका समितीच्या तृतीय प्रमुख संचालिका उषाताई चाटी या याचे मूर्तिमंत उदाहरण आहेत, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केले. उषाताई चाटी यांना १७ आॅगस्टला देवाज्ञा झाली. संघ परिवारातर्फे गुरुवारी सायंकाळी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
धंतोली येथील अहल्या मंदिरात आयोजित या कार्यक्रमाला राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, अंजनगाव सुर्जी येथील श्री देवनाथ मठाचे पीठाधीश जितेंद्रनाथ महाराज, समितीच्या प्रमुख कार्यवाहिका सीता अन्नदानम्, साध्वी ऋतंभरा प्रामुख्याने उपस्थित होते. भारतीय महिलांत वात्सल्य हे सर्वात मोठे शक्तिस्थान आहे. उषाताई चाटी खºया अर्थाने वात्सल्यमूर्तीच होत्या. आपल्या कार्यातून त्यांंनी नेहमी सर्वांना प्रेरणा दिली. मौलिक कार्य करत असताना कधीच स्वत:बद्दल कुणाला सांगितले नाही. सूर्यासम प्रकाश देणारे कार्य करत असतानादेखील गुप्त राहणे ही कठीण बाब असते. कठीण परिस्थितीतदेखील त्यांच्या चेहºयावर हास्य असायचे. त्यांच्या विचारांच्या मार्गावरुन चालत स्वत:सोबत समाजाला घडविणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, या शब्दांत सरसंघचालकांनी उषाताई चाटी यांना श्रद्धांजली अर्पण केली. संपर्कात येणाºया लोकांच्या मनातील नैराश्याचा अंधकार दूर करणाºया त्या ‘उषा’ होत्या. एखादा संकल्प घेतल्यावर त्याला पूर्ण करणे हेच त्यांचे ध्येय असायचे. स्वयंसेविकत्व त्यांनी निर्माण केले, अशा भावना शांताक्का यांनी व्यक्त केल्या. उषाताई चाटी या वटवृक्षाप्रमाणे होत्या. बोलण्यापेक्षा कृतीतून त्यांनी इतरांसमोर आदर्श प्रस्थापित केल्या. समाजातील अनेक यशवंतांच्या त्या खºया शक्ती व प्रेरणास्रोत होत्या, असे प्रतिपादन जितेंद्रनाथ महाराजांनी केले. यावेळी संघ परिवारातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी उषाताई चाटी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. चित्रा जोशी यांनी प्रास्ताविक केले तर लीना गहाणे यांनी संचालन केले.
आईच्या निधनानंतर दिला मायेचा आधार
सरसंघचालकांनी यावेळी उषाताई चाटींच्या आठवणींना उजाळा दिल्या. विद्यार्थी असतानापासून त्यांच्या घरी जायचो. संघाच्या अनेक बैठका त्यांच्या घरी व्हायच्या व त्यांनी बनविलेल्या गोळाभाताची प्रतीक्षा असायची. कारण त्यात चवीसोबतच त्यांचे वात्सल्य सामावले असायचे. जम्मूला एका कार्यक्रमादरम्यान माझ्या आईच्या निधनाची बातमी समजली. ही बाब फारशी कुणाला माहीत नव्हती. जम्मूहून रेल्वेत बसल्यावर त्याच गाडीतून परतणाºया उषाताई माझ्याजवळ आल्या. तू जेवण कर, कारण येथून तुला थेट चंद्रपूरला जायचे आहे, असे त्यांनी म्हटले. त्यांना सर्वकाही कळले होते, मात्र चेहºयावर दु:खाचे भाव न दाखविता त्यांनी मला आधार देण्याचे काम केले. त्यांचे मायेचे बोल हृदयाला स्पर्शून गेले होते, असे सरसंघचालकांनी सांगितले.