संघाचे प्रशिक्षण वर्ग प्रमाणपत्रासाठी नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 10:31 PM2018-05-14T22:31:38+5:302018-05-14T22:32:32+5:30
केवळ संघाची प्रार्थना, गणवेश यांच्यात असलेली समानता हीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख नाही. तर भारतातील विविधता व त्यात सामावलेली एकात्मता येथे दिसून येते. संघाच्या शिक्षावर्गातून कुठलेही प्रमाणपत्र मिळत नसले तरी यातून मिळणाऱ्या प्रशिक्षणातून व संस्कारांमधून स्वयंसेवक घडतात. या वर्गातून शिक्षित होणारे स्वयंसेवक देशाच्या सेवेसाठी समर्पितच असतात, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केवळ संघाची प्रार्थना, गणवेश यांच्यात असलेली समानता हीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख नाही. तर भारतातील विविधता व त्यात सामावलेली एकात्मता येथे दिसून येते. संघाच्या शिक्षावर्गातून कुठलेही प्रमाणपत्र मिळत नसले तरी यातून मिळणाऱ्या प्रशिक्षणातून व संस्कारांमधून स्वयंसेवक घडतात. या वर्गातून शिक्षित होणारे स्वयंसेवक देशाच्या सेवेसाठी समर्पितच असतात, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी व्यक्त केले. रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात सोमवारपासून संघाच्या तृतीय वर्ष संघशिक्षा वर्गाची सुरुवात झाली. याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
महर्षी व्यास सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात सहसरकार्यवाह व्ही.भागय्या, सहसरकार्यवाह व वर्गाचे पालक अधिकारी मुकुंदन, संघ शिक्षावर्गाचे सर्वाधिकारी अॅड.सरदार गजेंद्र सिंह, वर्ग कार्यवाह श्याम मनोहर हे प्रामुख्याने उपस्थित होते. यंदाच्या संघशिक्षा वर्गात ७०८ तरुण स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. डॉ. हेडगेवारांनी विकसित केलेल्या या अनोख्या प्रशिक्षणातून आनंद आणि शिस्त अंगी बाणते. हा प्रशिक्षण वर्ग फक्त शारीरिक व्यायाम, बौद्धिकापर्यंत मर्यादित नसून हे वैचारिक अधिष्ठान आहे. हा वर्ग म्हणजे ज्ञान, कर्म आणि भक्ती योगाचे समन्वयन आहे. मी राष्ट्राचा हा समर्पण भाव यातून निर्माण होतो व सामूहिक शिस्त आणि व्यावहारिक प्रशिक्षणाच्या माध्यमातून ऊर्जेची अनुभूती होते. येथे खºया अर्थाने एकात्म भारताचा अनुभव येतो, असे प्रतिपादन होसबळे यांनी केले. कार्यकर्ता निर्माण करणे ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. प्रशिक्षणातूनही सातत्य कायम राखले जाते. या प्रशिक्षण कालावधीत येणारा अनुभव महत्त्वपूर्ण असून, या अनुभवाची प्राप्ती म्हणजे इतर कुठेही न मिळणारी आयुष्यातील मौलिक गुंतवणूक असते, असे मुकुंदन म्हणाले.
संघाच्या ४१ प्रांतात जिल्हा पातळीवर महत्त्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या तसेच तहसील पातळीवर दोन वर्षांहून अधिक काम केलेल्या स्वयंसेवकांना येथे संधी देण्यात आली आहे. संघाच्या या वर्गात स्वयंसेवकांना विविध पातळींवर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नागपूरच्या कडक उन्हाळ्यातदेखील ठरविलेल्या वेळेप्रमाणेच दैनंदिन प्रशिक्षण सुरू राहणार असून, पहाटे ४ पासून रात्री १० पर्यंतचा दिनक्रम ठरवून देण्यात आला आहे. कार्यक्रमाला वर्गाचे मुख्य शिक्षण अखिलेश, सहमुख्य शिक्षक गंगाराजीव पांडे, बौद्धिक प्रमुख उत्तम प्रकाश, सहबौद्धिक प्रमुख कृष्णा जोशी, सेवा प्रमुख नवल किशोर, व्यवस्था प्रमुख सुनील भूलगांवकर हेदेखील उपस्थित होते.