संघप्रणित भामसंचे महागाईवरून केंद्र सरकारविरोधात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:12 AM2021-09-10T04:12:53+5:302021-09-10T04:12:53+5:30
नागपूर : कृषी कायद्यावरून भारतीय किसान संघ व स्वदेशी जागरण मंचने केंद्र सरकारविरोधात आंदोलन करून २४ तासदेखील उलटले नव्हते ...
नागपूर : कृषी कायद्यावरून भारतीय किसान संघ व स्वदेशी जागरण मंचने केंद्र सरकारविरोधात आंदोलन करून २४ तासदेखील उलटले नव्हते तोच महागाईच्या मुद्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित भारतीय मजदूर संघाने केंद्राविरोधात भूमिका घेतली. महागाईवर नियंत्रण आणण्यात केंद्राला अपयश आल्याचा आरोप करून भामसंने गुरुवारी संविधान चौकात आंदोलन केले.
अगोदरच कोरोनामुळे जनता बेहाल असताना महागाईने नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढतच असून महार्गाचा दर सहा टक्क्याहून अधिक झाला आहे. औषधांचे दरदेखील वाढले आहेत. काळाबाजार करणारे या स्थितीचा फायदा उचलत आहे. केंद्राने यासंदर्भात तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज आहे. उत्पादकांकडून तयार झालेल्या प्रत्येक वस्तूच्या उत्पादन खर्चाची घोषणा अनिवार्य करण्याचा कायदा तयार करायला हवा. तसेच इंधनांच्या दरांवर नियंत्रण आणले पाहिजे. सोबतच सार्वजनिक व खाजगी क्षेत्रांमधील कर्मचाऱ्यांचे वेतन वाढविण्यासाठी पावले उचलायला हवी, अशी मागणी भामसंतर्फे करण्यात आली. यावेळी भामसंच्या विदर्भ प्रांत अध्यक्षा शिल्पा देशपांडे, महामंत्री गजानन गटलेवार, राष्ट्रीय उपाध्यक्ष नीता चौबे, प्रभारी सीव्ही राजेश, उपाध्यक्ष गणेश गुल्हाने, नागपूर जिल्हा महामंत्री हर्षल ठोंबरे, नागपूर जिल्हा अध्यक्ष विजय ठाकरे, महिला प्रमुख सुहास तिवारी, प्रसिद्धी प्रमुख सुरेश चौधरी, त्रिलोचन खरबडे उपस्थित होते.