काँग्रेस नेत्यांना बदनाम करण्यामागे संघाचे षङ्यंत्र
By Admin | Published: February 15, 2016 03:06 AM2016-02-15T03:06:41+5:302016-02-15T03:06:41+5:30
पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस नेत्यांना बदनाम करण्याचे काम भाजप करीत आहे.
अशोक चव्हाण : कार्यकर्ता मेळाव्यात
सर्वसामान्यांसाठी संघर्षाचे आवाहन
नागपूर : पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस नेत्यांना बदनाम करण्याचे काम भाजप करीत आहे. यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे षङ्यंत्र असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी रविवारी केला. महाकाळकर सभागृहात आयोजित पूर्व नागपुरातील काँग्रेस कार्यक र्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
आजवर संकटाच्या काळात विदर्भातील जनता काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली आहे. याहीवेळी जातीयवादी संघटनांना रोखण्यासाठी विदर्भातील जनता काँग्रेसला साथ दिल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेस सत्तेत नसल्याने सामान्य लोकांचे नुकसान झाले आहे. भाजप सरकारच्या काळात राज्यात तीन हजारांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पण सरकारने कोणतीही मदत दिली नाही. गेल्या दीड वर्षात राज्य सरकारने कोणताही महत्त्वाचा निर्णय घेतला नाही. निवडणुकीत भाजप नेत्यांनी मोठमोठी आश्वासने दिली होती. परंतु ती पूर्ण झालेली नाही. काँग्रेसच्या काळात संकटातील शेतकऱ्यांचे २५ हजार कोटींचे कर्ज माफ केले होते.
देशाबाहेर मेक इन इंडियाचा नारा दिला जात आहे तर भारतात हेट इन इंडिया सुरू आहे. सामान्य नागरिकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले जात आहे. इंग्रजांच्या काळात जितका दहशतवाद नव्हता त्याहून अधिक भाजप सरकार पसरवत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.
शेतकरी, बेरोजगार, सर्वसामान्य नागरिक थोड्याच दिवसात केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे त्रस्त आहेत. त्यामुळे अच्छे दिन जाऊ द्या, आम्हाला जुनेच दिवस हवे आहेत, असे म्हणण्याची वेळ लोकांवर आली आहे. काँग्रेसच्या पराभवाचा फटका सामान्य माणसाला बसला आहे. लोकांसाठी काम करा मी तुमच्या पाठीशी आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व पंडित जवाहरलाल नेहरू यांची १२५ वी जयंती साजरी करीत आहोत. त्यांचा संदेश घराघरात पोहोचवा, असे आवाहन त्यांनी कार्यक र्त्यांना केले.
महापालिकेत भाजपच्या गेल्या १० वर्षांच्या कार्यकाळात प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. महापालिका निवडणुकीत तो जनतेपुढे मांडावयाचा आहे. खासगीकरणाच्या नावाखाली जनतेच्या खिशातून पैसा वसूल केला जात आहे. जनतेला न्याय देण्यासाठी संघर्षाची तयारी ठेवा, असे आवाहन शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी केले. यावेळी माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनीही मार्गदर्शन केले. अॅड. अभिजित वंजारी यांनी प्रास्ताविकातून महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आवाहन केले. यावेळी विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते आमदार विजय वडेट्टीवार, अनंतराव घारड, सेवक वाघाये, मुजीब पठाण, अतुल कोटेचा, मुन्ना ओझा, तानाजी वनवे, महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष बंटी शेळके, के.के. पांडे, प्रसन्ना तिडके, पुरुषोत्तम हजारे, मालू वनवे, कुमुदिनी कैकाडे आदी व्यासपीठावर होते. (प्रतिनिधी)
निवडणुकीत रिझल्ट हवे
काँग्रेसचे कार्यकर्ते संघटित व सक्रिय झाल्याशिवाय सामान्यांना न्याय मिळणार नाही. जातीयवादी संघटनांचा मुकाबला करण्यासाठी संघटित व्हा. महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत मला रिझल्ट पाहिजे. सामान्यांच्या समस्या जाणून घ्या, त्या सोडविण्याचा प्रयत्न करा. यासाठी वॉर्डावॉर्डात अभियान राबवा, असे आवाहन त्यांनी केले.
शहर काँग्रेस चव्हाणांच्या पाठीशी
राज्यातील जनता काँग्रेसच्या पाठीशी उभी राहत आहे. यामुळे अशोक चव्हाण यांना बदनाम करण्यासाठी आधीच्या राज्यपालांनी अनुमती नाकारलेल्या आदर्श प्रकरणाच्या चौकशीसाठी आताच्या राज्यपालांची अनुमती दिली. काँग्रेस नेत्यांनी भ्रष्टाचार केला होता तर गेल्या २४ महिन्यात माजी पंतप्रधान मनमोहनसिंग व काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना कारागृहात का टाकले नाही. उलट भाजपमध्येच भ्रष्टाचाराचे महामेरू आहेत. जेव्हा जेव्हा काँग्रेस नेत्यांवर संकट आले तेव्हा तेव्हा नागपुरातील जनता काँग्रेसच्या पाठीमागे ठामपणे उभी राहिली. चव्हाण यांच्याही पाठीमागे शहर काँग्रेस असल्याचा विश्वास काँग्रेस नेत्यांनी दिला.
अग्निहोत्री यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
नागपूर : अशोक चव्हाण यांच्या हस्ते शहर काँग्रेस कमिटीचे महासचिव उमाकांत अग्निहोत्री यांच्या पूर्व नागपुरातील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार विजय वडेट्टीवार, माजी आमदार सेवक वाघाये, अनंतराव घारड, विकास ठाकरे आदी उपस्थित होते. नागपुरात काँग्रेसला यश मिळविण्यासाठी अग्निहोत्री यांच्यासारख्या कार्यक र्त्यांची गरज आहे. शहरात पुन्हा काँग्रेसची सत्ता येईल. जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून रेशन कार्ड, रस्त्यांची कामे, पाणी समस्या तसेच लोकांच्या समस्या मार्गी लागतील, असा विश्वास अशोक चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी यशवंत साहूू व आर.के. वर्मा यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या १५० कार्यक र्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. नगरसेविका विद्या लोणारे, एम.एम. शर्मा, ब्लॉक अध्यक्ष पुरुषोत्तम लोणारे, उपाध्यक्ष कामता श्रीवास, प्रभाग ३५ चे अध्यक्ष केदार साहूू, प्रभाग ३३ चे अध्यक्ष विष्णू बनपेला, अंकुश भोवते, शोभाराम गुरुदेव, औरंगजेब अन्सारी, मधुसूदन सोनी, सरोज सिंग, गुड्डू यादव, राबिया शाह, पद्मा तभाने, हेमलता पटले, हलीमा शेख, जितेश तांबे, नौसाद भाई, बल्लू बिरहा, शुभम मोटघरे, अजय सिन्हा, नरेंद्र साहूू, दिलीप साहूू, जुनैद शेख यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.