नागपुरात संघर्षच यात्रेतून नेते गायब
By admin | Published: March 30, 2017 02:27 AM2017-03-30T02:27:51+5:302017-03-30T02:27:51+5:30
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेस- राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांनी एकत्र येत संघर्ष यात्रा काढली.
मुत्तेमवार, चतुर्वेदी, राऊत अनुपस्थित
नागपूर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेस- राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांनी एकत्र येत संघर्ष यात्रा काढली. मात्र, या यात्रेतून नागपुरातील काँग्रेस नेते दूरच असल्याचे पहायला मिळाले. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, माजी मंत्री नितीन राऊत यात्रेत सहभागी झाले नाहीत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करायला निघाले असताना नागपुरात काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष अद्याप शांत झालेला नाही, असे चित्र समोर आले आहे. बुधवारी चंद्रपूर जिल्ह्यातील पळसगाव येथून या यात्रेचा शुभारंभ झाला.
यात्रेत सहभागी होण्यासाठी सकाळी आमदार निवास येथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, पीरिपा आदी पक्षांचे नेते एकत्र आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यासह उपनेते आ. विजय वडेट्टीवार, सुनील केदार, डी.पी. सावंत, वीरेंद्र जगताप, रणजित कांबळे, यशोमती ठाकूर, राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, पीरिपांचे अध्यक्ष आ. प्रा. जोगेंद्र कवाडे आदी नेते एका एसी बसमध्ये बसून चंद्रपूरसाठी रवाना झाले. मात्र, नागपुरातून रवाना होणाऱ्या या नेत्यांना शुभेच्छा देण्यासाठी किंवा यात्रेत प्रत्यक्ष सहभागी होण्यासाठी स्थानिक नेते माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार,
एसी बसमधून गारेगार प्रवास
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काढल्या जाणाऱ्या संघर्षयात्रेत सहभागी होणाऱ्या नेत्यांनी बडेजावपणा मिरवू नये, असे अशा सूचना असतानाही विरोधी पक्षाचे नेते मर्सिडीज बेन्झच्या आलिशान एसी बसने नागपुरातून चंद्रपूरसाठी रवाना झाले. नागपूर ते चंद्रपूर असा गारेगार प्रवास या नेत्यांनी अनुभवला. शेतात उन्हाचे चटके सहन करणाऱ्या शेतकऱ्याच्या व्यथा एसी बसमधून प्रवास करणारे नेते कशा समजणार, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला. उपस्थित कार्यकर्त्यांमध्येही हा विषय कुतूहलाचा ठरला. आलिशान बसच्या नावाकडे प्रसार माध्यमाचे लक्ष जाताच मर्सिडीज बेन्झ लिहिलेले नाव टेपने झाकण्यासाठी तेवढ्यात आकाराचे ‘संघर्षयात्रा’ असे स्टीकर तयार करून त्यावर चिटकविण्याचा निर्णय वेळेवर घेण्यात आला, हे विशेष.