रामटेक व हिंगणामध्ये सांगली पॅटर्न ? अपक्ष लढण्याची तयारी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय

By गणेश हुड | Published: October 28, 2024 08:39 PM2024-10-28T20:39:58+5:302024-10-28T20:40:08+5:30

रामटेक मतदार संघ काँग्रेसला मिळावा, यासाठी शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मात्र अदृश्य शक्तीने घात केला.

Sangli pattern in Ramtek and Hingana? Preparation for independent fight, decision in meeting of office bearers and workers | रामटेक व हिंगणामध्ये सांगली पॅटर्न ? अपक्ष लढण्याची तयारी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय

रामटेक व हिंगणामध्ये सांगली पॅटर्न ? अपक्ष लढण्याची तयारी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय

नागपूर : रामटेक मतदार संघ काँग्रेसला मिळावा, यासाठी शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मात्र अदृश्य शक्तीने घात केला. लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्यातील ग्रामीणमधील सर्व सहा मतदार संघात मोर्चेबांधणी केली होती. परिणामी लोकसभा निवडणुकीत सर्वच ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराला मोठी लीड मिळाली. त्यामुळे महाविकास आघाडीत हिंगणा व रामटेक काँग्रेसला मिळावे, असा आग्रह होता. परंतु दोन्ही जागा काँग्रेसला मिळालेल्या नाही.  सोमवारी माजी मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वात आयोजित पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या  बैठकीत  रामटेक व हिंगणा अपक्ष लढण्याचे संकेत दिले. त्यामुळे दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडी सांगली पॅटर्न राबवण्याची शक्यता आहे. 

 यावेळी  खासदार श्यामकुमार बर्वे, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष कुंदा राऊत, माजी आमदार विजय घोडमारे,  माजी अध्यक्षा रश्मी बर्वे,  जि.प.सदस्या उज्ज्वला बोढारे, वृंदा नागपुरे,  संजय जगताप, ममता धोपटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अहमद शेख, उपसभापती प्रकाश नागपुरे, श्याम मंडपे, पंचायत समिती सभापती मनोहरे यांच्यासह हिंगणा मतदार संघातील काँग्रेस व राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. 
 रामटेक विधानसभा मतदारसंघात शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही प्रयत्न केले. परंतु यश मिळाले नाही. हिंगणा मतदार संघासाठीही आम्ही आग्रही होतो. परंतु महाविकास आघाडीत काँग्रेसला उमेदवारी मिळालेली नाही. 

 सर्वसामान्य जनता व कार्यकर्त्यांच्या ताकदीवर  रामटेक व  हिंगणा मतदारसंघात तयारी केली होती. परंतु दोन्ही ठिकाणी उमेदवारी नाकारल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. तिकीट वाटपात झालेल्या अन्यायावर बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

गेली पाच वर्षे आम्ही लढण्याची तयारी केली.जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक असा वा ग्रामपंचात निवडणुकीत याचे चांगले परिणाम मिळाले.  लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या  उमेदवारासाठी पदधिकारी व  कायर्कत्यांनी मेहनत घेतली. त्यामुळे  महाविकास आघाडीचा उमेदवार मोठ्या मताधिक्यांनी निवडणून आला. आता  विधानसभा निवडणुकीची तयारी  केली आहे. परंतु आघाडीत काँग्रेस उमेदवाराला उमेदवाराला उमेदवारी मिळालेली नाही. यावर बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. 

हिंगण्यातून दोन अर्ज दाखल करणार

बैठकीतील निर्णयानुसार  हिंगणा विधानसभा मतदार संघातून मंगळवारी महाविकास आघाडीतर्फे जिल्हा परिषदेच्या सदस्य उज्ज्वला बोढारे व वृंदा नागपुरे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यातील एक उमेदवारी अर्ज कायम ठेवला जाईल. याबाबतचा निर्णय बैठकीत घेतला जाणार आहे.

Web Title: Sangli pattern in Ramtek and Hingana? Preparation for independent fight, decision in meeting of office bearers and workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.