मनपात संघ विरुद्ध भाजप सामना
By admin | Published: February 7, 2017 01:46 AM2017-02-07T01:46:03+5:302017-02-07T01:46:03+5:30
नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर, भाजपातील अनेक असंतुष्टांनी वेगळी चूल मांडली आहे.
‘डॅमेज कंट्रोल’वर नेत्यांचा भर काहींची माघार, काही रिंगणात स्वयंसेवकांमध्ये मात्र संभ्रम
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर, भाजपातील अनेक असंतुष्टांनी वेगळी चूल मांडली आहे. अनेक प्रभागांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक व संघ परिवारातील नाराजांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. बऱ्याच नाराजांना मनविण्यात भाजप नेत्यांना यश आले असले तरी, काही प्रभागांत मात्र पक्षासमोर अडचण कायम आहे. संबंधित प्रभागांत संघ विरुद्ध भाजपा असा सामना रंगणार असून, यामुळे स्वयंसेवकांमध्ये मात्र संभ्रम निर्माण झाला आहे.
शहरातील बऱ्याच प्रभागांमध्ये संघ परिवारातील कार्यकर्त्यांना तिकिटांचे आश्वासन मिळाले होते. मात्र ऐनवेळी स्वयंसेवकांना डावलण्यात आले. त्यामुळे नाराज स्वयंसेवकांनी दुसऱ्या पक्षाची कास धरत किंवा थेट अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करीत भाजपाला आव्हान दिले. शहरातील १० हून अधिक महत्त्वाच्या जागांवर नाराज कार्यकर्ते भाजप उमेदवारांविरोधातच उभे ठाकले असल्याची स्थिती असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.(प्रतिनिधी)
नेत्यांच्या ‘डॅमेज कंट्रोल’ला यश
मनपा निवडणुकांचे तिकीट जाहीर झाल्यानंतर भाजपासोबतच संघ परिवारात खळबळ माजली आहे. काही प्रभागांत भाजपा उमेदवारांसमोर उभ्या ठाकलेल्या संघ स्वयंसेवकांची मनधरणी करण्याचा विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येत आहे. खुद्द केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी काही नाराज उमेदवारांशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांचे देखील काही नाराजांना फोन गेले. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे ‘डॅमेज कंट्रोल’ची मोठी जबाबदारी असून, सर्व आमदारदेखील यात सहभागी झाले आहेत. सोमवारीदेखील नेत्यांनी नाराजांशी संपर्क साधून त्यांची मनधरणी केली. काही अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी नाराजांनी बंडाची तलवार म्यान करण्याचा निर्णय घेतला आहे. बरेच जण अखेरच्या दिवशी अर्ज मागे घेण्याची शक्यता असल्याची माहिती शहराध्यक्ष आ. सुधाकर कोहळे यांनी दिली.
नाराजांमध्ये संभ्रम
निवडणूक उमेदवारी घोषित झाल्यानंतर संघ परिवारातील बऱ्याच नाराजांची नावे समोर आली होती. मात्र यातील अनेकांमध्ये अद्यापही निवडणूक लढावी की नाही, याबाबत संभ्रम कायम आहे. प्रभाग ३७ मधून अपक्ष अर्ज दाखल केलेल्या शिल्पा पथे यांनी सोमवारपर्यंत अर्ज मागे घेतला नव्हता. मंगळवारबाबत आताच भाष्य करता येणे शक्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
निवडणूक लढण्यावर ठाम : विशाखा जोशी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र प्रचारक रवींद्र जोशी यांच्या स्नुषा व पश्चिम नागपूर महिला आघाडीच्या अध्यक्षा डॉ. विशाखा जोशी या प्रभाग-१५ मधून शिवसेनेच्या तिकिटावरून निवडणूक लढणार आहेत. आर.एस.मुंडले धरमपेठ वाणिज्य महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण विभागप्रमुख असलेल्या जोशी या दीक्षाभूमी येथील आंबेडकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.ए.पी.जोशी यांच्या पत्नी आहेत. अनेक वर्षे भाजपात सचोटीने काम केल्यानंतरदेखील उमेदवारीच्या वेळी डावलण्यात आले. महिला आघाडीच्या एकाही कार्यकर्तीला तिकीट देण्यात आले नाही. हा कार्यकर्त्यांच्या सन्मानाचा विषय आहे. त्यामुळेच निवडणूक लढविण्यावर ठाम आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
ही अस्तित्वाचीच लढाई : श्रीपाद रिसालदार
संघ परिवाराशी संबंधित व भाजपाच्या शहर कार्यकारिणीतील वरिष्ठ नेते श्रीपाद रिसालदार यांनीदेखील प्रभाग १९ मधून आपली उमेदवारी सादर केली आहे. त्यांनादेखील पक्षाच्या मोठ्या नेत्यांकडून संपर्क करण्यात आला. मात्र त्यांनी निवडणूक लढण्याचा संकल्प केला आहे. अनेक वर्षांपासून काम करीत असताना तिकिटाच्या वेळी दुर्लक्ष करण्यात येते. कार्यकर्त्यांना संधीच मिळणार नसेल तर अस्तित्वच संकटात येते. ही अस्तित्वाचीच लढाई असल्याचे रिसालदार यांनी स्पष्ट केले.
विचार कायम, पद्धतीवर आक्षेप : प्रसन्न पातूरकर
प्रभाग १५ मधून संघ परिवारातील सदस्य व भाजपाचे वरिष्ठ कार्यकर्ते प्रसन्न पातूरकर हे देखील अपक्ष निवडणूक लढविणार असून, त्यांनी उमेदवारी कायम ठेवणार असल्याचे सांगितले. मी भाजपाचे विचार सोडलेले नाहीत. काही विषयांवर निश्चितच नाराजी आहे. विशेषत: ज्या पद्धतीने उमेदवारी वाटण्यात आली, त्यावर माझा आक्षेप आहे, असे त्यांनी सांगितले.