नागपुरात सानिकाला भोसकणारा माथेफिरू फरारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 12:45 AM2018-07-03T00:45:24+5:302018-07-03T00:48:27+5:30
लक्ष्मीनगरातील सानिका प्रदीप थूगावकर (वय १९) नामक तरुणीला चाकूने भोसकून गंभीर जखमी करणारा माथेफिरू रोहित मनोहर हेमनानी (वय २१) अद्याप फरारच आहे. त्याच्या मुसक्या बांधण्यासाठी पोलीस त्याचा जागोजागी शोध घेत आहेत. दुसरीकडे सानिकाची प्रकृती चिंताजनक असून, डॉक्टर तिच्यावर शर्थीचे उपचार करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लक्ष्मीनगरातील सानिका प्रदीप थूगावकर (वय १९) नामक तरुणीला चाकूने भोसकून गंभीर जखमी करणारा माथेफिरू रोहित मनोहर हेमनानी (वय २१) अद्याप फरारच आहे. त्याच्या मुसक्या बांधण्यासाठी पोलीस त्याचा जागोजागी शोध घेत आहेत. दुसरीकडे सानिकाची प्रकृती चिंताजनक असून, डॉक्टर तिच्यावर शर्थीचे उपचार करीत आहेत.
लक्ष्मीनगरातील सिद्धिविनायक अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सानिकाचे आरोपी हेमनानीसोबत दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. तो खामल्यातील सिंधी कॉलनीत राहतो. त्याच्यासोबत सानिकाचे जाणे-येणेही होते. त्याचे विचित्र वर्तन सानिकाला खटकत होते. त्यामुळे काही दिवसांपूर्वी तिने त्याला टाळणे सुरू केल्याने आरोपी संतापला होता. ब्रेकअप करण्यापूर्वी शेवटचे एकदा भेटू असे म्हणून आरोपी हेमनानीने तिला गळ घातली. या पार्श्वभूमीवर, रविवारी, १ जुलैला रात्री तो तिला भेटण्यासाठी अशोका हॉटेल समोरच्या सानिकाचे मामा अविनाश पाटणे यांच्या फायनान्स कार्यालयात आला. यावेळी मामा अविनाश आणि त्यांची पत्नीही कार्यालयात होती. मामासमोरच त्याने सानिकाला अनेक प्रश्न केले. तू माझ्याशी संबंध का तोडले, असा प्रश्न केला. तुझे वर्तन चांगले नाही, असे सुनावताच आरोपीने सानिकावर कट्यारसारख्या चाकूचे सपासप घाव घातले. छातीवर, पोटावर आणि पाठीवर चाकूचे घाव बसल्याने ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. ते पाहून अविनाश मध्ये धावले असता आरोपीने त्यांच्याही हातावर चाकू मारला आणि पळून गेला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
पहाटेपर्यंत चालली शस्त्रक्रिया
जखमी सानिकावर खामल्यातील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पहाटेपर्यंत तिच्यावर शस्त्रक्रिया चालली. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलीस सांगतात. दरम्यान, बजाजनगर पोलिसांनी पाटणे यांच्या तक्रारीवरून आरोपी हेमनानीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याचा ठिकठिकाणी शोध घेतला जात आहे.