माैदा शहराच्या सॅनिटायझेशनला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:08 AM2021-05-01T04:08:49+5:302021-05-01T04:08:49+5:30
रेवराल : माैदा शहरासह तालुक्यातील काेराेना रुग्णांची संख्या विचारात घेता संक्रमण राेखण्यासाठी माैदा शहराच्या सॅनिटायझेशनला नुकतीच सुरुवात करण्यात आली. ...
रेवराल : माैदा शहरासह तालुक्यातील काेराेना रुग्णांची संख्या विचारात घेता संक्रमण राेखण्यासाठी माैदा शहराच्या सॅनिटायझेशनला नुकतीच सुरुवात करण्यात आली. यासाठी तालुका प्रशासनाने एनटीपीसीची मदत घेतली आहे.
माैदा शहराची लाेकसंख्या १५ हजारांच्या वर आहे. शहरात काेराेना रुग्णांचे प्रमाण वाढत असताना स्थानिक नगरपंचायत प्रशासनाने अद्यापही प्रभावी उपाययाेजना करायला सुरुवात केली नाही. त्यामुळे तहसीलदार प्रशांत सांगडे, ठाणेदार हेमंतकुमार खराबे, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. रूपेश नारनवरे यांच्या सूचनेवरून स्थानिक एनटीपीसी प्रशासनाने सामाजिक दायित्व जाेपासत शहराच्या सॅनिटायझेशनला सुरुवात केली. शहरासाेबतच लगतच्या गावांचे सॅनिटायझेशन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नागरिकांनी भीती न बाळगता काेराेना प्रतिबंधक लस घ्यावी तसेच प्रतिबंधात्मक उपाययाेजनांचे पालन करावे, असे आवाहन डाॅ. रूपेश नारनवरे यांनी केले. माैदा शहरात एनटीपीसीच्या वतीने काेविड हाॅस्पिटल सुरू करण्यात येणार असून, यात येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यात आली. या हाॅस्पिटलमध्ये पहिल्या टप्प्यात १५ आणि दुसऱ्या टप्प्यात १५ बेडची तसेच माैदा येथील ग्रामीण रुग्णालयात १० अतिरिक्त बेडची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी दिली. यावेळी तहसीलदार प्रशांत सांगडे, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. रूपेश नारनवरे, देवेंद्र गोडबोले, राजू सोमनाथे, चेतन गोडबोले, जितू साठवणे, दुर्गेश थोटे यांच्यासह एनटीपीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.