स्थलांतरित मजुरांना नीरी शिकविणार सॅनिटायझेशन तंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 12:05 AM2020-06-14T00:05:44+5:302020-06-14T00:07:43+5:30
स्थलांतरित मजुरांची विस्कटलेली घडी बसविण्यासाठी त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती करून आर्थिक आधार देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र व राज्य शासनाला दिले आहेत. उद्योग सुरू करता येईल पण या काळात कोरोनाचा फैलाव रोखणे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. अशावेळी नागपूर शहरात नीरीने काही डीएलएसएच्या मदतीने मजूर तसेच निराश्रित आणि विद्यार्थ्यांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी सॅनिटायझेशनचे तंत्र शिकविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्थलांतरित मजुरांची विस्कटलेली घडी बसविण्यासाठी त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती करून आर्थिक आधार देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र व राज्य शासनाला दिले आहेत. उद्योग सुरू करता येईल पण या काळात कोरोनाचा फैलाव रोखणे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. अशावेळी नागपूर शहरात नीरीने काही डीएलएसएच्या मदतीने मजूर तसेच निराश्रित आणि विद्यार्थ्यांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी सॅनिटायझेशनचे तंत्र शिकविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी), डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिस आॅथारिटी (डीएलएसए) तसेच काही सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक नुकतीच नीरी येथे घेण्यात आली. यावेळी डीएलएसएचे सचिव न्या. अभिजित देशमुख, नीरीचे संचालक डॉ. राकेश कुमार, जलवायू परिवर्तन विभागाचे प्रमुख व मुख्य वैज्ञानिक डॉ. जे. एस. पांडे, मुख्य वैज्ञानिक डॉ. साधना रायलू, आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास सोसायटीचे अरशद तन्वीर खान, समीर पटेल, आपुलकी सामाजिक संस्थेचे अमिताभ पावडे, डॉ समीर देशपांडे, नीरीचे वरिष्ठ प्रधान वैज्ञानिक डॉ. प्रदीप साळवे आदी उपस्थित होते.
देशाची आर्थिक घडी सुधारण्यासाठी लॉकडाऊनमध्ये शिथिलता देणे अगत्याचे झाले आहे. त्यानुसार लवकरच शाळा, महाविद्यालये, उद्योग, हॉटेल्स सुरू होणार आहेत. अशावेळी त्यांच्या योग्य सॅनिटायझेशनचा प्रश्न महत्त्वाचा आहे. विशेषत: संशयित रुग्णांसाठी क्वारंटाईन सेंटर व स्थलांतरित मजुरांसाठी तात्पुरता निवारा केंद्र बनविण्यात आलेल्या महापालिका व जिल्हा परिषदेच्या शाळांचा प्रश्न महत्त्वाचा आहे. अशा ठिकाणांच्या सुरक्षेसाठी नीरी महत्त्वाची भूमिका बजावू शकते. त्यानुसार मजूर, विद्यार्थी तसेच निराश्रिताना सॅनिटायझेशन राखण्याचे प्रशिक्षण नीरी देणार आहे.
डॉ. राकेश कुमार यांनी सांगितले, एपिडेमोलॉजि ही कामाचे ज्ञान, शक्यता व आकड्यावर अवलंबून असते. अशा भीषण परिस्थितीत सॅनिटायझेशन आणि कामाच्या ठिकाणचे निर्जंतुकीकरण आवश्यक आहे. यासाठी प्रभावी धोरण आणि नियोजन गरजेचे आहे. ही आवश्यकता लक्षात घेत नीरीतर्फे इंग्लिश, मराठी आणि हिंदी अशा तिन्ही भाषेत प्रशिक्षण साहित्य बनविणार असल्याचे डॉ. कुमार यांनी स्पष्ट केले. इतर उपस्थित प्रतिनिधींनी यावेळी परिस्थिती आणि काय उपाय करता येईल, यावर आपली भूमिका मांडली.