नागपूर रेल्वेस्थानकावर मशीनमधून मिळणार सॅनिटायझर, साबण अन् बॉडी लोशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 10:16 PM2020-09-04T22:16:45+5:302020-09-04T22:17:18+5:30
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने रेल्वेस्थानकावर दोन ऑटोमेटेड व्हेंडिंग मशीन लावल्या आहेत. या मशीनमध्ये पैसे टाकल्यानंतर प्रवाशांना सॅनिटायझर, साबण आणि बॉडी लोशनसह इतर गरजेच्या वस्तू मिळणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे मोजक्याच रेल्वेगाड्या धावत आहेत. खूपच गरजेचे असल्यामुळे प्रवासी प्रवास करीत आहेत. त्यामुळे प्रवाशांना प्रवासात काळजी घेता यावी यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने रेल्वेस्थानकावर दोन ऑटोमेटेड व्हेंडिंग मशीन लावल्या आहेत. या मशीनमध्ये पैसे टाकल्यानंतर प्रवाशांना सॅनिटायझर, साबण आणि बॉडी लोशनसह इतर गरजेच्या वस्तू मिळणार आहेत.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांनी प्रवाशांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विभागाने यासाठी एका खासगी कंपनीसोबत करार केला आहे. त्यानुसार एखाद्या प्रवाशाने मशीनमध्ये पैसे टाकल्यानंतर त्याला पर्सनल केअर प्रोडक्ट मिळणार आहेत. यात सॅनिटायझर, पावडर, बॉडी लोशन, साबण, मास्क आदी वस्तंचा समावेश आहे. मशीनच्या शुभारंभप्रसंगी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील, सहायक वाणिज्य व्यवस्थापक विजय थूल, वाणिज्य निरीक्षक ताराप्रसाद आचार्य आणि अधिकारी उपस्थित होते. या मशीनमुळे रेल्वेला वर्षाकाठी २ लाख ४० हजारांचा महसूल मिळणार आहे.