संजय काशीकर यांची अकाली ‘एक्झिट’

By admin | Published: April 25, 2017 02:13 AM2017-04-25T02:13:37+5:302017-04-25T02:13:37+5:30

सुप्रसिद्ध नाटककार व नेपथ्यकार संजय काशीकर यांचे सोमवारी निधन झाले़ ते ५९ वर्षांचे होते. १० एप्रिल रोजी अपघात झाल्यानंतर त्यांनी तब्बल १४ दिवस मृत्यूशी झुंज दिली़ ....

Sanjay Kashikar's premature 'exit' | संजय काशीकर यांची अकाली ‘एक्झिट’

संजय काशीकर यांची अकाली ‘एक्झिट’

Next

१४ दिवस दिली मृत्यूशी झुंज : नागपूरच्या रंगभूमीचे मोठे नुकसान
नागपूर : सुप्रसिद्ध नाटककार व नेपथ्यकार संजय काशीकर यांचे सोमवारी निधन झाले़ ते ५९ वर्षांचे होते. १० एप्रिल रोजी अपघात झाल्यानंतर त्यांनी तब्बल १४ दिवस मृत्यूशी झुंज दिली़ पण, अखेर या लढाईत मृत्यूच जिंकला़ जीवनाच्या रंगमंचावरून संजय काशीकर यांनी घेतलेल्या या अकाली ‘एक्झिट’मुळे नागपूरच्या रंगभूमीचे मोठे नुकसान झाले आहे़
लेखक, अभिनेते, दिग्दर्शक आणि नेपथ्यकार म्हणून ख्याती असलेले संजय काशीकर १० एप्रिल रोजी दिवसभर कामे आटोपून संध्याकाळच्या सुमारास घराबाहेर पडले़ दरम्यान, खामला चौक येथे त्यांना एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने, ते डिव्हायडरवर पडले़ त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. स्थानिक नागरिकांनीच त्यांना रुग्णालयात दाखल केले़ येथे अतिदक्षता विभागात उपचारादरम्यान सोमवारी अखेर त्यांचे निधन झाले़ सोमवारीच संध्याकाळी त्यांच्यावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले़ यावेळी नाट्यक्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती़ त्यांच्यामागे पत्नी व एक मुलगी आहे़ संजय काशीकर यांच्या अकाली निधनाने नागपूरकर रंगकर्मींना मोठा धक्का बसला आहे़ (प्रतिनिधी)

लेखक, अभिनेता, दिग्दर्शक,
संगीतकार आणि नेपथ्यकारही
संजय काशीकर हे चौफेर प्रतिभेचे धनी होते़ १९८२ साली त्यांनी अभिनयाच्या माध्यमातून रंगभूमीवर प्रवेश केला़ ‘सासरेबुवा जपून’, ‘अखंड दहन’, ‘परिक्रमा’, ‘आंधळया खिडक्या’ या नाटकातील त्यांचा अभिनय विशेष गाजला़ १९९५ पर्यंत ते अभिनयाच्या क्षेत्रात होते़ यानंतर त्यांनी नाटकाचे दिग्दर्शन व नेपथ्यरचनेचे कार्य सुरू केले़ उत्कृष्ट दिग्दर्शक आणि नेपथ्यकार म्हणून त्यांनी राज्य शासन, अखिल भारतीय नाट्य परिषदेसह इतरही अनेक प्रतिष्ठित संस्थांचे राज्यस्तरीय पुरस्कार मिळवले़
‘तो’ पुरस्कार शेवटचा ठरला
अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेचा वर्धापनदिन नुकताच पार पडला़ या कार्यक्रमात संजय काशीकर यांना टावर या नाटकासाठी उत्कृष्ट नेपथ्यकाराचा पुरस्कार जाहीर झाला तेव्हा काशीकर यांची मृत्यूशी झुंज सुरूच होती़ सतीश काळबांडे यांनी त्यांच्यावतीने हा पुरस्कार स्वीकारला़ आपल्या आयुष्यात नाटक प्रत्यक्ष जगणारे व नाटकाच्या दर्जाबाबत कुठलीही तडजोड न स्वीकारणारे संजय काशीकर हे या क्षेत्रातील नवोदितांसाठी मार्गदर्शकाचे काम करीत होते़ त्यांच्या अशा अकाली जाण्याने एका सच्च्या रंगकर्मीसोबतच एक कुशल मार्गदर्शकही हरपला आहे़

Web Title: Sanjay Kashikar's premature 'exit'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.