दिग्रसमध्ये संजय राठोडांना धक्का, तिवसामध्ये यशोमती ठाकूर यांचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2023 09:45 PM2023-04-28T21:45:17+5:302023-04-28T21:46:05+5:30
Nagpur News दिग्रस बाजार समितीत महाविकास आघाडीने १८ पैकी १४ जागा जिंकत मंत्री संजय राठोड यांना धक्का दिला आहे. तर, तिवसामध्ये माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वातील पॅनलने विरोधकांचा धुव्वा उडवून सर्व १८ जागा जिंकल्या आहेत.
नागपूर : बाजार समित्यांच्या निवडणुकीमुळे राजकीय पारा चढला आहे. कुठे दिग्गजांना धक्का बसला असून काहींना दबदबा कायम ठेवण्यात यश आले आहे. दिग्रस बाजार समितीत महाविकास आघाडीने १८ पैकी १४ जागा जिंकत मंत्री संजय राठोड यांना धक्का दिला आहे. तर, तिवसामध्ये माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वातील पॅनलने विरोधकांचा धुव्वा उडवून सर्व १८ जागा जिंकल्या आहेत. वर्धा जिल्ह्यातील वर्धा, पुलगाव, सिंदी व आष्टी या चारही बाजार समित्यांवर विजयी झेंडा फडकविण्यात महाविकास आघाडीला यश आले आहे.
पालकमंत्री संजय राठोड यांच्या दिग्रस मतदारसंघातील बाजार समिती म्हणून या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. येथे मात्र माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने १८ पैकी १४ जागा जिंकत वर्चस्व अबाधित राखले. राठोड यांच्या गटाला केवळ चार जागा मिळाल्या.
अमरावती जिल्ह्यातील तिवसा बाजार समितीवर पुन्हा एकदा माजी मंत्री आ. यशोमती ठाकूर यांचे वर्चस्व कायम राहिले. या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, प्रहार, युवा स्वाभिमान पॅनलचा दारुण पराभव झाला. पहिल्यांदा माजी मंत्री व आमदार यशोमती ठाकूर यांनी सहकार क्षेत्रातील बाजार समितीत ठाकरे गटासोबत उमेदवार दिले. ही रणनीती यशस्वी ठरली.
वर्धा जिल्ह्यात वर्धा, पुलगाव, सिंदी व आष्टी या बाजार समित्यांवर महाविकास आघाडीने झेंडा फडकविला. वर्धा व पुलगावमध्ये सहकार नेते माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख व काँग्रेसचे आ. रणजित कांबळे यांच्या गटाचे उमेदवार विजयी झाले. सेलू येथे शेखर शेंडे, सुरेश देशमुख गटाने १५ जागा जिंकल्या तर आष्टी बाजार समितीत काँग्रेसच्या शेतकरी एकता पॅनलचे ७ उमेदवार विजयी झाले आहेत.
-----------------------------