संजय राऊत भेटीसाठी पोहचले देशमुखांच्या घरी; वज्रमूठ सभेच्या तयारीवर चर्चा
By कमलेश वानखेडे | Published: April 15, 2023 02:42 PM2023-04-15T14:42:07+5:302023-04-15T14:45:15+5:30
सोबतच्या समर्थकांना वगळून बंदद्वार चर्चा
नागपूर : उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी सकाळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सिव्हिल लाईन्समधील घरी जाऊन भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी सोबतच्या समर्थकांना वगळून बंदद्वार चर्चा केली. भेटीनंतर वज्रमूठ सभेच्या तयारीबाबत चर्चा झाल्याचे दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले.
राऊत हे शुक्रवारी दुपारी नागपुरात दाखल झाले. त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट घेत वज्रमूठ सभेच्या तयारीची माहिती घेतली. त्यानंतर शनिवारी सकाळी ते अनिल देशमुख यांच्या भेटीसाठी पोहचले. यावेळी देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख, माजी आमदार दुष्यंत चतुर्वेदी उपस्थित होते. तासभराच्या भेटीनंतर राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले, विजय मल्ल्या याला भारतात आणणे कठीण झाले आहे, म्हणून विरोधकांना जेल मध्ये टाकले जात आहे. मेहुल चौकसी साठी तर सीबीआय विशेष जेट विमानाने गेले होते.
निरव मोदी पण येत नाही, म्हणून काळापैसा कसा आणेल, हे सरकारचे अपयश आहे. नागपूरची एक संस्कृती आहे, सर्वव्यापी समाज आहे, पण आता विरोधी पक्षाची सभा होऊ नये म्हणून मोर्चे काढले जात आहे, कोर्टात जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली.