संजय राऊत यांना पक्षाने बळीचा बकरा बनविले, तुरुंगातून आल्यावर समजावलेले; निलम गोऱ्हेंचे वक्तव्य

By नरेश डोंगरे | Published: December 7, 2023 08:44 PM2023-12-07T20:44:39+5:302023-12-07T20:45:07+5:30

पक्षात जनाधार असलेल्यांनाही न्याय मिळत नव्हता : मनोहर जोशी सारख्या नेत्यांना अपमाणित केले जायचे

Sanjay Raut was made a scapegoat by the Shivsena party; Neelam Gore's statement | संजय राऊत यांना पक्षाने बळीचा बकरा बनविले, तुरुंगातून आल्यावर समजावलेले; निलम गोऱ्हेंचे वक्तव्य

संजय राऊत यांना पक्षाने बळीचा बकरा बनविले, तुरुंगातून आल्यावर समजावलेले; निलम गोऱ्हेंचे वक्तव्य

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : संजय राऊत यांना पक्षाने बळीचा बकरा बनविले, असे स्पष्ट मत विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी मांडले. नागपूर प्रेस क्लब तर्फे आयोजित 'मिट द प्रेस' कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र यांनी गोऱ्हे यांचा बुके देऊन स्वागत केले. श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रम्हाशंकर त्रिपाठी यांनी प्रस्तावणा केल्यानंतर गोऱ्हे यांनी नागपूर - विदर्भाशी असलेले नाते, येथील हिवाळी अधिवेशन आणि भूमीका यासंबंधाने त्या सविस्तर बोलल्या. त्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवरही त्यांनी आपली मते व्यक्त केली. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, मनोहर जोशी, संजय राऊत अशा अनेकांसंदर्भात त्या मोकळेपणाने बोलल्या.

प्रत्येक राजकीय नेत्याची शैली वेगळी असते. शिवसेना प्रमुखांची वेगळी होती. त्यावेळी कठोर शिस्त होती. त्यांना बारिक माहिती असायची. आमच्याकडे २०१५ नंतर कार्यपद्धती बदलली. मला एक्सेस होता. मात्र, प्रश्न घेऊन जाणाऱ्या अनेक बड्या नेत्यांना न्याय मिळत नव्हता. नेत्यांना काम करू देत नव्हते. अपमाणित केले जायचे. त्यांना मुद्दामहून बाजुला टाकले जायचे. मनोहर जोशींच्या बाबतीत हेच झाले.

शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजारी पडल्यानंतर पक्षात काय सुरू आहे, हे कळतच नव्हते. पक्षश्रेष्ठींना हवे असलेले संजय राऊत यांच्याकडून बोलून घेतले जायचे. त्यांच्याबद्दल आदर असला तरी त्यांची शब्दप्रणाली पटत नव्हती. त्यामुळे आपण त्यांना जेलमधून आल्यानंतर समजावल देखिल. आक्रमक बोलण्यापेक्षा वैचारिक मतभेद वेगळ्या पद्धतीनेही मांडता येतात. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाले. नंतर राऊत यांना बळीचा बकरा बनविल्याचे लक्षात आले.

शिंदेंच्या नाराजीची कल्पना होती
कोव्हिडमध्ये शिंदे यांच्यावर मोठी जबाबदारी होती. मात्र, त्यांना कामच करू दिले जात नव्हते. उद्धव ठाकरे आजारी पडल्यानंतर संवाद हरविला. पारदर्शिपणाही दिसून येत नव्हता. कोव्हीड कमी झाल्यानंतर या सर्व बाबी जाणवायला लागल्या. डावलले जात असल्याची अनेकांची भावना झाली. कालांतराने पक्षाची कार्यपद्धती बदलली. एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे भावना व्यक्त केल्या होत्या. त्यावरून ते नाराज असल्याची कल्पना होती. मात्र, पक्षात फुट पडल्यानंतर महिना-दोन महिने सून्न पडल्यासारखे झाले होते.

साहेब म्हणतील त्याला हो म्हणायचे
साहेब म्हणतील त्याला हो म्हणायचे हीच पक्षाची शिस्त होती. आदित्य ठाकरे यांच्याबद्दल चांगल्या भावना आहेत. मात्र बड्या नेत्यांपेक्षा त्यांनाच जास्त निमंत्रण मिळत होते. जनाधार असलेल्या नेत्यांना डावलले जात असल्याने खटकू लागले. आता जे प्रकरण कोर्टात आहे, कुठले रेकॉर्ड नाहीत. कुणाला कशासाठी निवडल ते माहित नाही. बऱ्याच वेळी कोऱ्या पेपरवर सह्या घेतल्या जातात. आता अनेक त्रुटी उघड झाल्याचे त्या म्हणाल्या.

शक्ती कायदा त्रुट्यांमध्ये अडकला
महिला मुलींवर होणाऱ्या अत्याचारांचा मुद्दा आणि शक्ती कायद्यासंबंधाने प्रश्न आले असता गोऱ्हे यांनी हा कायदा त्रुट्यांमध्ये अडकल्याचे सांगितले. अल्पवयीन मुलांना चुकीच्या व्यवसायात ढकलणारे रॅकेट सक्रिय आहेत. हे सगळं थांबविण्यासाठी पोलिस प्रशासन कमी पडत आहे. या संबंधाने अन्य संस्थांमध्येही अनास्था दिसते’, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या. पूर्वी महिलांवर होणाऱ्या अन्यायाला गांभीर्याने घेतले जात नव्हते. मात्र आता महिला आपल्या हक्कासाठी सजग होत आहेत. अडचणीत असणाऱ्या महिलांसाठी भरोसा सेल आणि ११२ क्रमांक महत्त्वाचे ठरत आहे, असेही त्या म्हणाल्या.

Web Title: Sanjay Raut was made a scapegoat by the Shivsena party; Neelam Gore's statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.