संस्कृत भाषेने जगाला शाश्वत विचार दिला
By Admin | Published: January 22, 2017 02:10 AM2017-01-22T02:10:42+5:302017-01-22T02:11:58+5:30
संस्कृत भाषा जगातील सर्व भाषांची मूळ भाषा असून या भाषेने जगाला शाश्वत विचार दिला आहे,
अनुप कुमार यांचे प्रतिपादन : भागीरथप्रसाद त्रिपाठींना कालिदास संस्कृतव्रती पुरस्कार
नागपूर : संस्कृत भाषा जगातील सर्व भाषांची मूळ भाषा असून या भाषेने जगाला शाश्वत विचार दिला आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी संस्कृत संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी केले. कार्यक्रमात संस्कृतचे विद्वान पंडित भागीरथप्रसाद त्रिपाठी यांना कालिदास संस्कृतव्रती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेकच्यावतीने वसंतराव देशपांडे सभागृहात भारतवर्षीय संस्कृत संमेलनाचे आयोजन करण्यात आले. उद्घाटक म्हणून व्हीएनआयटीचे अध्यक्ष विश्राम जामदार उपस्थित होते. व्यासपीठावर कुलगुरु डॉ. उमा वैद्य, बैद्यनाथ प्रतिष्ठानचे सुरेश शर्मा, कुलसचिव डॉ. अरविंद जोशी, मधुसुधन पेन्ना, डॉ. नंदा पुरी, संमेलनाच्या सहसमन्वयक सविता होले उपस्थित होत्या. विभागीय आयुक्त अनुपकुमार म्हणाले, आद्यकवी कालिदासांच्या मेघदूत मधील कविता जगातील सर्वांग सुंदर कविता आहेत. त्यामुळेच संस्कृत भाषा अजूनही जिवंत आहे. विश्राम जामदार म्हणाले, संस्कृत भाषा श्रीमंत व प्रगल्भ असून या भाषेतील ज्ञान अद्वितीय आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास संस्कृत भाषेला व विद्यापीठाला प्रगतीकडे नेण्यास मदत होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. कुलगुरु डॉ. उमा वैद्य म्हणाल्या, संस्कृत संमेलनाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी समाजातील विविध संस्थांनी पुढे आले पाहिजे. संस्कृत भाषा टिकली नाही तर उज्ज्वल भारतीय संस्कृतीचा स्रोत टिकणार नाही. त्यामुळे संस्कृत भाषा टिकविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात संस्कृत भाषेचे विद्वान महामहोपाध्याय भागीरथ त्रिपाठी यांनामहाकवी कालिदास संस्कृतव्रती राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला.
त्यांचे चिरंजीव आशापती शास्त्री यांनी या पुरस्काराचा स्वीकार केला. ५० हजार रुपये रोख व गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. समारंभात मान्यवरांच्या हस्ते डिजिटल ब्लॉगचे लोकार्पण, विद्यापीठातील प्राध्यापकांच्या सहा पुस्तकांचे व विद्यार्थ्यांच्या तीन हस्तलिखितांचे विमोचन करण्यात आले.
संचालन प्रा. डॉ. पराग जोशी यांनी केले. आभार डॉ. अरविंद जोशी यांनी आभार मानले. संमेलनाला विविध राज्य आणि महाराष्ट्रातून आलेले संस्कृतप्रेमी उपस्थित होते. (प्रतिनिधी)