संस्कृत सर्वसामान्याची भाषा व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:11 AM2021-08-29T04:11:17+5:302021-08-29T04:11:17+5:30

रामटेक : संस्कृत भाषा ही सर्व भाषांची जननी आहे. ही भाषा काही लोकांपुरतीच मर्यादित न राहता सर्वसामान्यांची भाषा व्हावी, ...

Sanskrit should be the common language | संस्कृत सर्वसामान्याची भाषा व्हावी

संस्कृत सर्वसामान्याची भाषा व्हावी

Next

रामटेक : संस्कृत भाषा ही सर्व भाषांची जननी आहे. ही भाषा काही लोकांपुरतीच मर्यादित न राहता सर्वसामान्यांची भाषा व्हावी, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.

उच्च शिक्षण विभाग तसेच कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य महाकवि कालिदास संस्कृत साधना पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन शनिवारी रामटेक येथे करण्यात आले होते. तीत सामंत यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

खा. डॉ. विकास महात्मे, खा. कृपाल तुमाने, आ. आशिष जयस्वाल, आ. अभिजित वंजारी यांच्यासह कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी, उज्जैनच्या महर्षि पाणिनि संस्कृत व वैदिक विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. विजयकुमार, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी संस्थापक कुलगुरू डॉ. पंकज चांदे, उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक प्रकाश बच्छाव, नागपूर विभागाचे सहसंचालक डॉ. संजय ठाकरे आदी यावेळी उपस्थित होते.

महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्काराने सन्मानित सत्कारमूर्तींनी संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याचे सामाजिक कार्य यापुढेही अविरतपणे सुरू ठेवावे, असे आवाहन सामंत यांनी याप्रसंगी केले.

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ केवळ रामटेक पुरतेच मर्यादित न राहता त्याची उपकेंद्रे रत्नागिरीसह पुणे, परभणी तसेच जळगाव येथे सुरू करण्यात येणार आहेत. संस्कृत भाषेची व्यापकता वाढविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्काराची परंपरा यापुढे अखंडितपणे सुरु राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संस्कृत भाषा केवळ शिकून उपयोग नाही तर ती बोलता यावी व दैनंदिन व्यवहारात तिचा उपयोग व्हावा, यासाठी ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या नावाने विद्यापीठ स्तरावर ‘संस्कृत भाषा वक्तृत्व स्पर्धा’ आयोजित करण्यात येईल. तसेच मराठी भाषेला ‘अभिजात भाषे’चा दर्जा मिळावा यासाठी सर्वांनी एकत्रितपणे पुढाकार घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. प्रास्ताविकामध्ये कुलगुरु वरखेडी यांनी महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्काराविषयी माहिती दिली. या सोहळ्यामध्ये २०१५ ते २०२० या कालावधीतील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले आहे. यावेळी ४८ सत्कारमूर्तींना मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व प्रशस्तीपत्र तसेच रोख २५ हजार रुपयांची रक्कम प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे सहा गट आहेत. त्यामध्ये प्राचीन संस्कृत पंडित, वेदमूर्ती, संस्कृत शिक्षक व इतर, संस्कृत प्राध्यापक व तत्सम अध्यापक, संस्कृत कार्यकर्ता तसेच अन्य राज्यातील संस्कृत पंडितांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. संचालन प्रा. पराग जोशी तर महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार समितीच्या सचिव प्रा. कविता होले यांनी आभार मानले.

Web Title: Sanskrit should be the common language

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.