संत हरिराम बाप्पा कालवश

By Admin | Published: December 29, 2014 02:33 AM2014-12-29T02:33:48+5:302014-12-29T02:33:48+5:30

गुजराती समाजाचे श्रद्धास्थान व मानवसेवेचे आदर्श असलेले श्रद्धेय संत हरिराम बाप्पा यांना रविवारी सकाळी देवाज्ञा झाली.

Sant Hariram Bappa Kalvash | संत हरिराम बाप्पा कालवश

संत हरिराम बाप्पा कालवश

googlenewsNext

नागपूर : गुजराती समाजाचे श्रद्धास्थान व मानवसेवेचे आदर्श असलेले श्रद्धेय संत हरिराम बाप्पा यांना रविवारी सकाळी देवाज्ञा झाली. गुजरातमधील राजकोट येथील अमरेली या गावी त्यांचे निधन झाल्याची बातमी कळताच त्यांचे भक्तगण शोकाकूल झाले. ‘छोटे जलाराम बाप्पा’ म्हणून प्रसिद्ध असलेले हरिराम बाप्पा यांचे वय ८० वर्षे होते. गुजरात जरी जन्मभूमी असली तरी नागपूर शहर त्यांची कर्मभूमी होती. देश-विदेशातील गुजराती बांधवांसोबतच इतरही समाजात त्यांचे भक्त आहेत. रविवारी रात्री उशीरा त्यांचे पार्थिव विशेष विमानाने नागपुरला आणण्यात आले.
हरिराम बाप्पा भागवत कथेसाठी जसदण येथे गेले होते. येथे रविवारी कथा समापन होणार होती. परंतु सकाळी ८.३० च्या सुमारासच त्यांचे अकस्मात निधन झाले. संत हरिराम बाप्पा यांच्या निधनाची दु:खद बातमी कळताच उपराजधानीतील गुजराती बांधव शोकसागरात बुडाले. गांधीबाग येथील संत हरिराम बाप्पा मार्ग येथील त्यांच्या निवासस्थानी भक्तांची गर्दी झाली होती. शिवाय बाप्पांच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आलेल्या क्वेटा कॉलनी येथील संत जलाराम मंदिरात दुपारपासूनच भक्त एकत्र आले होते.
कर्मभूमी नागपुरात मानवसेवेचे व्रत
नागपूर : संत हरिराम बाप्पा यांचा जन्म ६ सप्टेंबर १९३४ रोजी गुजरातमधील जसदण या गावी झाला होता. आई कुंवरबाई तसेच वडील कानजीभाई ठकराल यांच्याकडून लहानपणीच बाप्पांना धार्मिक संस्कार मिळाले होते. इतर सहकारी खेळात मग्न असताना हरिराम बाप्पा मात्र मंदिरांमध्ये जाऊन परमात्म्याच्या भक्तीत लीन होऊन जात. वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांनी मुंबई येथील विलेपार्लेस्थित संन्यास आश्रमात स्वामी महेश्वरानंदजी यांच्याकडून वैष्णव धर्माची दीक्षा ग्रहण केली. व्यवसायासाठी त्यांचे कुटुंब नागपुरात स्थलांतरित झाले. हरिराम बाप्पा यांच्या प्रेरणेतून जलाराम मंदिर उभारण्यात आले. गेल्या २५ वर्षांपासून येथे सातत्याने भोजनदान तसेच अखंड रामधुनी सुरू आहे. बाप्पांच्याच मार्गदर्शनात २००६-०७ मध्ये जलाराम सत्संग मंडळाच्या वतीने ऐतिहासिक अशा एक वर्षीय रामकथेचे आयोजन करण्यात आले होते. रामकथेदरम्यान बाप्पा यांच्या मुखातून बाहेर पडणारे श्लोक तसेच ओळींनी भक्त अक्षरश: रममाण होऊन जात. भजन व भोजन यांच्यामुळे ते सर्वदूर प्रसिद्ध होते. शिवाय मंदिरात फिजिओथेरपी सेंटर, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक दवाखाना, अ‍ॅक्युप्रेशर हेल्थ सेंटर इत्यादी प्रकारच्या वैद्यकीय सहाय्यतादेखील प्रदान करण्यात येतात. आॅक्टोबर महिन्यात त्यांनी उपराजधानीतील भक्तांना अखेरचे मार्गदर्शन केले होते. इतवारी, मध्य तसेच पूर्व नागपूरसह विदर्भातदेखील त्यांचे असंख्य भक्त आहेत.
भजन करो और भोजन कराओ
आध्यात्मिक विचारांमुळे त्यांनी शहरातील निरनिराळ्या मंदिरांसमोर बसणाऱ्या भिक्षेकऱ्यांना भोजनदान करणे सुरू केले. ज्या सायकलवरून ते हे धार्मिक काम करायचे तीच चोरीला गेली अन् तेव्हापासून एकाच जागी भोजनदान करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. कुटुंबातील इतर सदस्यांच्या सहमतीने गांधीबाग येथील त्यांच्या निवासस्थानी अन्नछत्र उघडण्यात आले. ‘भजन करो और भोजन कराओ’ या मंत्राद्वारे त्यांनी लाखो भक्तगणांना दातृत्वाची प्रेरणा दिली. मंदिरात भजन, कीर्तन व भक्ती करीत असताना गरीब, वंचित व्यक्तींना भोजन देणे हीच खरी मानवसेवा आहे, असे ते नेहमी म्हणायचे.
बाप्पांची दिनचर्या
हरिराम बाप्पांची दिनचर्या अगोदरपासूनच संन्यासाप्रमाणे होती. सकाळी ४.३० वाजता ते जागे व्हायचे. प्रार्थना आटोपली की खिचडी तयार करुन गरीब व भुकेलेल्या लोकांना भोजनदान करण्यासाठी निघायचे. यानंतर घरी येऊन स्नानवगैरे आटोपल्यावर आपले क्षेत्र किंवा शहरात जेथेही भागवत कथा असेल ती ऐकायला जायचे. सुंदरकांडाचा पाठ ते दररोज सायंकाळी श्रवण करायचे. स्वत:च्या नावे एकही आश्रम किंवा मठ नसतानादेखील त्यांनी आयुष्यभर मानवसेवेचे व्रत हाती घेतले व अखेरच्या क्षणापर्यंत त्याचे पालन केले.(प्रतिनिधी)
आज होणार अंत्यसंस्कार
श्रद्धेय हरिराम बाप्पा यांच्या निधनाची बातमी कळताच संत जलाराम सत्संग मंडळाची बैठक झाली व अंत्यविधीची रुपरेषा ठरविण्यात आली. त्यांचे पार्थिव शरीर सोमवारी सकाळी ७.३० वाजता संत जलाराम मंदिर येथे आणण्यात येईल. येथे अंत्यदर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी निरंतर भजन-कीर्तन यांचे पठण होईल. दुपारी ३ वाजता क्वेटा कॉलनी ते सुनील हॉटेल चौक, जुना भंडारा रोड, किराणा बाजार, नेहरू पुतळा, शहीद चौक, टांगा स्टँड चौक, वल्लभाचार्य चौक मार्गे त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणण्यात येईल. येथून गंगाबाई घाटाच्या दिशेने अंत्ययात्रा निघेल अशी माहिती जलाराम सत्संग मंडळातर्फे देण्यात आली.

Web Title: Sant Hariram Bappa Kalvash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.