संतोष आंबेकरची तुरुंगात रवानगी
By Admin | Published: March 10, 2016 03:35 AM2016-03-10T03:35:05+5:302016-03-10T03:35:05+5:30
गॅँगस्टर संतोष आंबेकरला शोधून काढण्यात अपयशी ठरलेल्या शहर पोलिसांना त्याची पोलीस कोठडीसुद्धा वाढवून घेता आली नाही.
पोलीस कोठडीत वाढ नाही
नागपूर : गॅँगस्टर संतोष आंबेकरला शोधून काढण्यात अपयशी ठरलेल्या शहर पोलिसांना त्याची पोलीस कोठडीसुद्धा वाढवून घेता आली नाही. केवळ सात दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर आंबेकरची तुरुंगात रवानगी झाली.
२७ जानेवारी रोजी मकोकाअंतर्गत गुन्हा दाखल होत असल्याचे समजताच आंबेकर फरार झाला होता. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पोलिसांनी आंबेकरच्या घरी धाड टाकून चल-अचल संपत्तीचे दस्तऐवज जप्त केले होते. त्यानंतरही तो हाती लागला नव्हता. त्याच्या शोधात पोलीस दिल्ली, मुंबई आणि इंदोरपर्यंत जाऊन रिकाम्या हाती परतले होते. त्यानंतर पोलिसांनी आंबेकरची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली. पोलिसांच्या कारवाईची माहिती होताच २ मार्च रोजी आंबेकर परत आला. त्याच्यासोबतच प्रकाश मानकर नावाचा आरोपीसुद्धा अटक करण्यात आली. दोघांनाही ३ मार्च रोजी न्यायालयात सादर करून ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी घेण्यात आली.
सूत्रानुसार कोठडीदरम्यान पोलीस आंबेकर प्रकरणाशी संबंधित कुठलीही ठोस माहिती मिळवू शकले नाही. आंबेकरने पोलिसांना आपल्या गोष्टींमध्ये फसवून सात दिवस काढले. तपासाच्या प्रगतीच्या आधारावर कोठडीत वाढ करण्याची पोलिसांची मागणी बुधवारी मोका न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायालयाने न्यायिक कोठडीत दोघांनाही तुरुंगात पाठविले. या प्रकरणात युवराज माथनकर, संजय फातोडे, विजय बोरकर, लोकेश कुभिटकर, सचिन आडुलकर, आकाश बोरकर, शक्ती मनपिया आणि विनोद मसराम यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. केवळ गौतम भटकर हा आरोपी फरार आहे. (प्रतिनिधी)