नागपुरातील कुख्यात गुंड संतोष आंबेकरने केले आत्मसमर्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 02:03 PM2018-04-12T14:03:31+5:302018-04-12T14:03:45+5:30

नागपूरच्या गुन्हेगारी जगताचा म्होरक्या समजला जाणारा कुख्यात गुंड संतोष आंबेकर याने आज गुरुवारी न्यायालयात आत्मसमर्पण केले. गेल्या दोन वर्षापासून तो फरार होता.

Santosh Ambekar surrendered in Nagpur | नागपुरातील कुख्यात गुंड संतोष आंबेकरने केले आत्मसमर्पण

नागपुरातील कुख्यात गुंड संतोष आंबेकरने केले आत्मसमर्पण

Next
ठळक मुद्देदोन वर्षांपासून होता फरार

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : नागपूरच्या गुन्हेगारी जगताचा म्होरक्या समजला जाणारा कुख्यात गुंड संतोष आंबेकर याने आज गुरुवारी न्यायालयात आत्मसमर्पण केले. गेल्या दोन वर्षापासून तो फरार होता.
दोन वर्षांपूर्वी कुख्यात गुंड बाल्या गावंडे यांची हत्या झाली होती. बाल्याला जावई मानणारा त्याचा खास मित्र आणि साथीदारांनी त्याची अमानुष हत्या केली होती. दीड कोटी रुपयांच्या भूखंडाच्या वाटणीवरून वाद झाल्यानंतर बाल्या गावंडे याने संतोष आंबेकरच्या नावाने काही ठिकाणी शिवीगाळ केली होती. बाल्याची खूनशी वृत्ती ध्यानात घेता तो धोकादायक ठरू शकतो, हे संतोषच्या ध्यानात आले होते. त्यामुळे त्याने बाल्याच्या खास मित्रालाच फितवले आणि त्याच्याकडून बाल्याला एक ओली पार्टी देऊन त्याच रात्री त्याची हत्या करवून घेतली होती. कळमना पोलिसांनी आरोपींना अटक केल्यानंतर तपासात या हत्याकांडाचा मास्टर मार्इंड संतोष असल्याचे उघड झाले होते. त्यामुळे पोलिसांनी संतोषवर गुन्हा दाखल केला. मात्र, गुन्हा दाखल होण्याची कुणकुण लागताच संतोष फरार झाला. तेव्हापासून पोलीस त्याला शोधत होते. इकडे बाल्या गावंडेच्या हत्याकांडातील अन्य आरोपींविरुद्ध पोलिसांनी कोर्टात दोषारोपपत्र सादर केले. सुनावणीदरम्यान कोर्टातून त्यांची निर्दोष सुटका झाली. संतोष मात्र फरारच होता. या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी संतोषची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. ते लक्षात घेत संतोष आज अचानक न्यायालयात पोहचला. आपण आत्मसमर्पण करीत असल्याचे त्याने वकिलाच्या माध्यमातून न्यायालयाला सांगितले.
दरम्यान, संतोषने आत्मसमर्पण केल्याची माहिती शहरात वायुवेगाने पसरली. त्यामुळे पोलीस, पत्रकार आणि गुन्हेगारी जगतातील अनेकांनी न्यायालयात धाव घेतली. संतोषला कोर्टाने कारागृहात पाठविण्याचे आदेश दिले. त्यानुसार, दुपारी त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली. शुक्रवारी कळमना पोलीस त्याला प्रॉडक्शन वॉरंटच्या आधारे ताब्यात घेणार असल्याचे सांगितले जाते.

 

 

Web Title: Santosh Ambekar surrendered in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा