संतोषला मुंबईच्या ‘भाई’ची रसद

By admin | Published: March 4, 2016 02:58 AM2016-03-04T02:58:37+5:302016-03-04T03:00:16+5:30

पोलिसांना तब्बल ३५ दिवस गुंगारा देत विविध दरबारात हजेरी लावणारा नागपुरी डॉन संतोष आंबेकर याला फरारीच्या कालावधीत मुंबईच्या ‘भाई’ने रसद पुरविल्याची चर्चा आहे.

Santosh Mumbai's 'Brother' Logistics | संतोषला मुंबईच्या ‘भाई’ची रसद

संतोषला मुंबईच्या ‘भाई’ची रसद

Next

खास माणसेही सोबत : ठिकठिकाणी देवदर्शन
नरेश डोंगरे नागपूर
पोलिसांना तब्बल ३५ दिवस गुंगारा देत विविध दरबारात हजेरी लावणारा नागपुरी डॉन संतोष आंबेकर याला फरारीच्या कालावधीत मुंबईच्या ‘भाई’ने रसद पुरविल्याची चर्चा आहे. काळजी घेण्यासाठी भाईची काही खास माणसेही संतोषच्या सोबत होती. दरम्यान, भाई वगळता नागपुरातील साऱ्याच मित्रांनी झिडकारल्याने संतोषला सारे देव आठवले. त्यामुळे तो देवदर्शन करीत फिरला. त्यानंतर याच भाईच्या सल्ल्याने संतोषने पोलिसांकडे शरणागती पत्करल्याची गुन्हेगारी वर्तुळात चर्चा आहे.
बिल्डरकडून तगडी सुपारी घेतल्यानंतर ‘पोस्टर गँग’ने मनीषनगरातील स्वप्नील बिडवईच्या निवासस्थानी तोडफोड करून त्याच्या घरावर कब्जा केला होता. सुपारीची तगडी रक्कम मिळाल्यानंतर पोस्टर गँगने शहरात होर्डिंगबाजी करून नागपूरकरांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. त्याची जोरदार चर्चा सुरू होताच सोनेगाव पोलीस ठाण्यात बिल्डरसह पोस्टर गँगचा युवराज माथनकर, गौतम भटकर यांच्यासह ३० ते ४० आरोपींवर गुन्हा दाखल केला. त्याची चर्चा सुरू असतानाच नागपूरच्या गुन्हेगारी जगताचा भाई संतोष आंबेकरने २६ जानेवारीला भव्य रॅली काढून ‘देशभक्ती’ची धून वाजविण्याचा प्रयत्न केला.
मात्र, ही रॅलीच अनेकांना खटकणारी ठरली. २७ तारखेला या रॅलीबाबत लकडगंज ठाण्यात संतोष पोलिसांकडे खुलासा करीत होता. तर त्याच वेळी बिडवईच्या प्रकरणात ‘सुपारी’ गिळल्याचे उघड झाल्यामुळे सोनेगाव ठाण्यात संतोषसह ‘पोस्टर गँग’मधील ११ जणांविरुद्ध मोक्का लावण्यात आला. ते कळताच संतोष नागपुरातून पसार झाला. २८ जानेवारीपासून पोलीस त्याचा इंदोर, मुंबई, ठाण्यासह ठिकठिकाणी शोध घेत होती. जागोजागी छापे घातले जात होते, मात्र तो काही हाती लागत नव्हता. त्याने पोलिसांना तब्बल ३५ दिवस गुंगारा दिला.

दरबारात पूजा-अर्चना
इतवारीच्या बंगल्यात दरबार भरवून अनेक प्रकरणांत मांडवली घडवून आणणारा संतोष फरारीच्या कालावधीत विविध ठिकाणच्या दरबारात जाऊन आला. प्रारंभी निजामुद्दीनला (दिल्ली) मथ्था टेकल्यानंतर तेथून वैष्णोदेवी मातेच्या दरबारात पोहोचला. तेथे माताराणीचे दर्शन घेऊन कटरा येथे परतल्यानंतर संतोषने अजमेरचा दर्गा गाठला. येथे नतमस्तक झाल्यानंतर जयपूर आणि परत तो शिर्डीला आला. साईबाबांच्या दरबारात पूजा-अर्चना केल्यानंतर आता काय करायचे, कुठे जायचे, असा त्याला प्रश्न पडला होता. कारण ‘भाई‘ वगळता संतोषला प्रत्येकांनीच झिडकारले होते. त्यामुळे त्याने भाईच्या सल्ल्यावरूनच शिर्डीहून थेट नागपूर गाठले आणि पोलीस ठाण्याच्या आवारात पोहोचला.

Web Title: Santosh Mumbai's 'Brother' Logistics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.