विश्व ज्युनियर सिकई मार्शल आर्ट स्पर्धेत नागपूरच्या सान्याला सुवर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 10:47 AM2018-11-01T10:47:24+5:302018-11-01T10:48:04+5:30
१४ वर्षीय खेळाडू सान्या पिल्लई हिने द. कोरियात नुकत्याच झालेल्या तिसऱ्या विश्व ज्युनियर सिकई मार्शल आर्ट स्पर्धेच्या १७ वर्षे मुलींच्या ५४ किलो वजन गटात सुवर्ण पदक जिंकले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : १४ वर्षीय खेळाडू सान्या पिल्लई हिने द. कोरियात नुकत्याच झालेल्या तिसऱ्या विश्व ज्युनियर सिकई मार्शल आर्ट स्पर्धेच्या १७ वर्षे मुलींच्या ५४ किलो वजन गटात सुवर्ण पदक जिंकले. १९ देशांचे खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले होते.
सान्याने आपल्या गटात चीन, लाओस, फिलिपिन्स आणि कोरियाच्या प्रतिस्पर्धी खेळाडूंविरुद्ध विजय मिळविले. सान्या ही मनोज आणि खुशी पिल्लई यांची कन्या असून काटोल रोड येथील सेंटर पॉर्इंट स्कूलची नवव्या वर्गाची विद्यार्थिनी आहे. शारीरिक तंदुरुस्तीसाठी मार्शल आर्टकडे वळलेल्या सान्याने किक बॉक्ंिसग, तायक्वांडो आणि सिकईसारख्या मार्शल आर्ट प्रकारात स्वत:च्या कामगिरीचा अल्पावधीतच ठसा उमटविला आहे.
सिनियर गटात ब्राऊन बेल्टची मानकरी असलेल्या सान्याने याआधी विविध स्पर्धांमध्ये ३२ सुवर्णांसह ४२ पदके जिंकली आहेत.
स्पर्धेतून परतल्यानंतर चाहते आणि आप्तेष्टांनी सान्याचे विमानतळावर जल्लोषात स्वागत केले. पत्रकारांशी बोलताना ती म्हणाली,‘भारताच्या तुलनेत कोरियातील तापमान अतिशय थंड होते. आम्ही अशा वातावरणाशी एकरुप झालो. विरोधी खेळाडूंच्या किक तसेच चपळता चांगली होती. त्यांच्या खेळाचे सूक्ष्म निरीक्षण करीत विजयासाठी डावपेच आखले. नेमके कसे खेळायचे यासाठी कोचशी संवाद साधला. या सर्व गोष्टींचा लाभ झाला.’ अंतिम सामन्यात कोरियाच्या प्रतिस्पर्धीविरुद्ध अतिशय चुरशीची झुंज झाली, असे सान्याने एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. सिकई मार्शल आर्टचे संस्थापक मझहर खान हे सान्याचे मार्गदर्शक असून युगांत उगले आणि नीलेश सोमकुसवार हे कोच आहेत.
सान्याच्या कामगिरीने प्रभावित होऊन टायटन कंपनीने तिला ‘टायटन कन्या ब्रॅन्ड अॅम्बेसिडर’ नेमले आहे. मुलींनी मार्शल आर्टसारख्या खेळात करियर करावे आणि समाजात खंबीरपणे वाटचाल करावी, असा संदेश देण्यासाठी आपण काम करणार असल्याचे सान्याने सांगितले.