रोपट्याचा झाला वटवृक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:25 AM2020-12-15T04:25:23+5:302020-12-15T04:25:23+5:30
बाबूजी स्वत क्रिकेट खेळायचे. फुटबॉल खेळायचे. ते आम्हाला सांगायचे, की फुटबॉलचा खेळ म्हणजे जीवनाचे सार आहे. तुम्हाला आयुष्यात गोल ...
बाबूजी स्वत क्रिकेट खेळायचे. फुटबॉल खेळायचे. ते आम्हाला सांगायचे, की फुटबॉलचा खेळ म्हणजे जीवनाचे सार आहे. तुम्हाला आयुष्यात गोल करायचा असेल, तर ‘डायरेक्ट किक’ मारून गोल कमी वेळा होतो. एका खेळाडूकडून दुसऱ्या खेळाडूकडे चेंडू ‘पास’ करीत गोल लवकर होऊ शकतो. सगळ्यांना बरोबर घेऊनच यश मिळू शकते.
बाबूजींचा आणखी एक संदेश असा, की ‘काळाबरोबर राहा, जमान्याबरोबर चला, नवीन तंत्र आत्मसात करा; तरच तुम्ही प्रगती करू शकाल.’ आधुनिक तंत्रज्ञानात भाषिक वृत्तपत्रांमध्ये ‘लोकमत’ने जे केले, ते महाराष्ट्रात कोणी केले नाही. नवे यंत्र आणि तंत्र यांचा आग्रह धरताना बाबूजी आणखी एक मंत्र देऊन गेले. तो मंत्र होता.. नवे यंत्र आणि नवे तंत्र यामागचा माणूस किती जिद्दीने काम करतो, हा. या सगळ्यात शेवटी माणूस महत्त्वाचा आहे. त्याची सेवा, त्याचे समर्पण, त्याचे कामामध्ये रमणे आणि त्याचा आनंद घेणे महत्त्वाचे आहे. त्यातून असे एक वातावरण निर्माण करा, की प्रत्येकाला ‘लोकमत’ आपले वाटले पाहिजे. आज ३३ वर्षांनंतर हे निश्चितपणे सांगता येते, की बाबूजींनी ‘लोकमत परिवाराची’ संकल्पना रुजविली, वाढविली आणि आज या परिवारात हजारो माणसे सर्व शक्ती लावून काम करीत आहेत. ‘लोकमत’च्या यशात या परिवार संकल्पनेचा फार मोठा वाटा आहे. तंत्रज्ञानाच्या पातळीवर ‘लोकमत’ची कामगिरी अतुलनीय व चमकदार आहे. मात्र, या अत्याधुनिक तंत्राच्या जोडीला बाबूजींनी दिलेला मंत्र आहे.
बाबूजी म्हणायचे, मुंबईत एक इमारत पडून दोन माणसे ठार झाली, तर ती केवढी बातमी बनते! ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार, शेतमजूर आणि सर्वसामान्य लोक यांच्यावर होणाऱ्या अन्याय-अत्याचारांच्या बातम्यांना वाव कोठे आहे? बाबूजींचा हा दृष्टिकोन आणीबाणीमध्ये ‘लोकमत’ने यशस्वी करून दाखवला. आणीबाणीत निर्बंध आले; पण ‘लोकमत’ला त्याची अडचण आली नाही, कारण लोकांचे प्रश्न त्या काळात ‘लोकमत’ने असे लावून धरले, की सरकार ‘लोकमत’विरुद्ध कोणतीही कारवाई करू शकले नाही. तेलातील, अन्नातील भेसळ; जालना जिल्ह्यातील एका मुलीचे गहाण प्रकरण असे अनेक विषय ‘लोकमत’ने आणीबाणीत हाताळले.
बाबूजींनी दाखवून दिले, की लोकांचे प्रश्न खूप आहेत. सर्व विषय आणि वृत्तपत्रांचे सर्व कॉलम राजकारणाभोवती फिरत ठेवू नका. आज दुर्दैवाने या देशात नेमके असेच घडत आहे. जे लोकांचे प्रश्न नाहीत, त्यांची चर्चाच जास्त होत आहे.
बाबूजी सांगायचे, ‘सर्वांत सोपी पत्रकारिता म्हणजे राजकीय पत्रकारिता.’ ज्याच्याशी तुम्ही बोलता, त्यालाही विषय फार माहिती नसतो आणि बोलणाऱ्या पत्रकाराला तर जवळपास माहितीच नसतो. पण विज्ञान, तंत्रज्ञान, अवकाशज्ञान, संरक्षणविषयक विषय; आर्थिक, सामाजिक विषय, शैक्षणिक विषय अशा प्रश्नांची चर्चा करायची, तर पत्रकाराला किमान ज्ञानाची, वाचनाची गरज आहे.
अनेक बैठकांमध्ये बाबूजी नेहमी सांगायचे- निव्वळ बातम्या देणे, एवढेच ‘लोकमत’चे उद्दिष्ट आहे का? ‘लोकमत’ची सामाजिक बांधिलकी आहे; ती बांधिलकी कधी विसरू नका. राष्ट्रीय विचारापासून दूर जाऊ नका. प्रलोभनांना बळी पडू नका. त्यांनी ‘लोकमत’ परिवाराला सामाजिक बांधिलकीचा जो विचार दिला, त्यामुळेच ‘लोकमत’ आणि संकटातील माणूस यांचे नाते जुळले. तुम्ही ज्या भागात काम करता, त्या विभागातील नागरिकांच्या सुख-दु:खात सहभागी व्हा. शक्य तेवढी त्याला मदत करा. त्याच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडताना कोणाची भीडभाड ठेवू नका. सरकारचे भाट बनू नका. या निर्धाराने काम केले, तर ‘लोकमत’ला वाचक डोक्यावर उचलून घेतील. लोकमतचे राष्ट्रीय विचाराला प्राधान्य राहिलेच; पण त्याचबरोबर कोणाचीही बातमी मारायची नाही, कोणत्याही बातमीचे हक्काचे व्यासपीठ ‘लोकमत’ झाले पाहिजे, हा विश्वास ‘लोकमत’च्या पानावर लोकांना जाणवू लागला. राजकीय मतभेद असणाऱ्या व्यक्तीची बातमीसुद्धा फोटोसह पहिल्या पानावर प्रकाशित होऊ लागताच विदर्भाच्या वृत्तपत्रसृष्टीचा चेहरामोहरा बदलला. वृत्तपत्रात सर्वसामान्य माणसाला जागा आहे; किंबहुना सर्वसामान्य माणसासाठीच वृत्तपत्र आहे. शेतकरी, शेतमजूर, कामगार, ग्रामीण भागातील कष्टकरी महिला या सर्वांचे प्रश्न हिरीरीने मांडण्याची भूमिका ‘लोकमत’ने उचलून धरली आणि म्हणून सकाळ झाल्यावर लोकमत कधी येतो, याची वाट पाहत वाचक आतुरतेने उभा राहिला. ‘लोकमत’चे हे यश बाबूजींच्या विचारशक्तीमध्ये आहे.
‘लोकमत’ने इंदिराजींच्या विचारांचा, नेतृत्वाचा पुरस्कार सातत्याने केला. याचा अर्थ, ‘लोकमत’ हे काँग्रेस पक्षाचे मुखपत्र कधीही नव्हते व नाही. ‘लोकमत’ हे निव्वळ वृत्तपत्र आहे. चांगल्याचा पुरस्कार करायचा आणि ढोंगाचा बुडबुडा फोडायचा, ही सामाजिक रखवालदारी हेच ‘लोकमत’चे धोरण आहे.
वाचकांविषयी असणारी निष्ठा हे बाबूजींच्या विचारप्रक्रियेचे सूत्र होते. हा अट्टाहास वाचकांसाठी आहे, ही त्यांची पक्की धारणा होती. ते म्हणाले होते, की ‘लोकमत’चा वाचक माझा मालक आहे, ही भावना मी पहिल्या अंकापासून जपली.
बाबूजी पुढे लिहितात- सामान्यपणे माझे असे निरीक्षण आहे, की ‘लोकमत’ ज्या राष्ट्रीय विचाराने दलित, पददलित, आदिवासी, संधी नाकारलेले यांच्या बाजूने उभे राहावे म्हणून मी सुरू केले; त्या विचारांपासून ‘लोकमत’ दूर गेलेले नाही. ‘माझे म्हणणेच बरोबर’, असा माझा आग्रह नाही. ‘लोकमत’ची मूळ प्रेरणा बलवान देश उभा करावा, त्यात वृत्तपत्राचे योगदान असावे, ही आहे. प्रसंगी ‘लोकमत’मधून सरकारवर, व्यक्तींवर, धोरणातील चुकांवर कठोर टीका होते, ती मी वाचतो. अशी टीका मी वावगी मानत नाही; मात्र ती द्वेषमूलक असता कामा नये, विचारमूलक असावी. ‘लोकमत’चा पसारा वाढतो आहे. तीन भाषांत आता हे वृत्तपत्र प्रकाशित होते आहे. अनेक नवीन लोक येतात. घर छोटे होते, तेव्हा प्रश्न छोटे होते. आता अनेक प्रश्न, अनेक अडचणी आहेत. अशा वेळी काम करताना परस्परांत दुरावा निर्माण होऊ देऊ नका. ‘लोकमत’ ही सामाजिक चळवळ आहे, हे सामाजिक हत्यार आहे, या भावनेने संस्था उभी केली.