सुरेल सतारवादन आणि दर्जेदार वादनाला दाद

By admin | Published: January 10, 2016 03:33 AM2016-01-10T03:33:43+5:302016-01-10T03:33:43+5:30

पं. परिमल सदाफळ यांचे ह्रदयाला भिडणारे सतारवादन आणि उस्ताद अहमद जान थिरकवा यांचे नातू आणि पणतू उस्ताद मुस्तफा थिरकवा

Saraal sitaradan and quality suit | सुरेल सतारवादन आणि दर्जेदार वादनाला दाद

सुरेल सतारवादन आणि दर्जेदार वादनाला दाद

Next

पं. प्रभाकर देसाई स्मृती ताल महोत्सवाचा समारोप :
ताल साधना समूहाचे आयोजन
नागपूर : पं. परिमल सदाफळ यांचे ह्रदयाला भिडणारे सतारवादन आणि उस्ताद अहमद जान थिरकवा यांचे नातू आणि पणतू उस्ताद मुस्तफा थिरकवा व शारिक थिरकवा यांच्या गतिमान तबलावादनाने शनिवारची सायंकाळ संगीतमय झाली. तालाशी खेळणारे आणि माधुर्यपूर्ण सतारवादनाने पं. सदाफळ यांनी रसिकांना जिंकले तर थिरकवा यांच्या जुगलबंदीने रसिकांना दाद द्यायला पाडले. या सादरीकरणासह पं. प्रभाकर देसाई स्मृती ताल उत्सवाचा समारोप करण्यात आला.
ज्येष्ठ तबलावादक पं. प्रभाकर देसाई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या शिष्य परिवाराने स्थापन केलेल्या ताल साधना समूहाच्यावतीने या ताल उत्सवचे आयोजन साई सभागृह, शंकरनगर येथे करण्यात आले. कार्यक्रमाचा प्रारंभ पं. परिमल सदाफळ यांच्या सतारवादनाने करण्यात आला. त्यांनी यमन कल्याण या मधुर रागाने वादनाचा प्रारंभ केला. आलाप, जोड, झाला सादर करून त्यांनी या यमनकल्याणची हळुवार उकल केली. रागाची बंदिश सादर करताना त्यांनी मोठ्या कौशल्याने यमनकल्याणची सौदर्यस्थळे रसिकांच्या लक्षात आणून देत दाद घेतली. यानंतर त्यांनी खमाज रागातील बंदिश सादर करून वादनाचा समारोप केला. ज्येष्ठ सतारवादक पं. रविशंकर यांचे शिष्य असलेल्या पं. सदाफळ यांच्या वादनाने पं. रविशंकर यांच्या वादनाचे स्मरण रसिकांना होणे स्वाभाविक होते. त्यांना तबल्यावर सुयोग्य साथसंगत युवा तबलावादक संदेश् पोपटकर यांनी केली.
यानंतर उस्ताद मुस्तफा थिरकवा आणि शारिक थिरकवा यांच्या दर्जेदार वादनाने रसिकांचा ताबा घेतला. त्यांनी त्रितालात जुगलबंदी सादर केली. तबल्यावरचे स्पष्ट बोल, गतिमानता आणि सर्वच घराण्याच्या संमिश्रतेचे त्यांचे वादन रसिकांना आनंद देणारे होते. देश - विदेशात आपल्या वादनाने रसिकप्रिय झालेल्या थिरकवा द्वयांनी अचूक सम गाठत सादर केलेला त्रिताल उपस्थितांना दाद द्यायला भाग पाडणारा होता.
त्यांना संवादिनीवर लहरासंगत गोविंद गडीकर यांनी केली. याप्रसंगी प्रारंभी स्थानिक तबलावादक मनोज घुसे, विनय ढोक, वेद ढोक, विजय लातुरकर यांनी परण, चक्रदार, तोडे आदी वादनप्रकार सादर करून रसिकांना आनंद दिला. त्यांना संवादिनीवर आनंद फडणवीस तर सारंगीवर चिंतामण देशपांडे यांनी साथसंगत केली.
हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी ताल साधना समूहाचे अध्यक्ष श्रीकांत देसाई, रवी सातफळे आणि सर्व कलावंतांनी परिश्रम घेतले.(प्रतिनिधी)

Web Title: Saraal sitaradan and quality suit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.