सैराट तरुणाईचा झिंगाट जल्लोष
By admin | Published: January 1, 2017 02:44 AM2017-01-01T02:44:05+5:302017-01-01T02:44:05+5:30
गारठवणाऱ्या थंडीने पारा तासागणिक खाली येत असताना तरुणाईच्या उत्साहाचा आलेख मात्र वेगाने वर जात होता...
नागपूर : गारठवणाऱ्या थंडीने पारा तासागणिक खाली येत असताना तरुणाईच्या उत्साहाचा आलेख मात्र वेगाने वर जात होता...नवीन वर्षाच्या स्वागताला अधीर झालेल्या तरुणाईचे जत्थे भारी परफ्युम मारून फुटाळा चौपाटीवर रात्री ८ पासून पोहोचायला लागले होते...इकडे धरमपेठ, रविनगर, सदर परिसरातही अनेकांनी डीजेच्या तालावर ठेका धरला होता...यंदा एक सेकंद उशिराने का होईना पण अखेर घड्याळाने १२ चा गजर केला... अन् काही क्षण श्वास रोखून धरलेल्या नागपूरकरांनी आसमंत उजळून टाकणाऱ्या फटाक्याच्या आतषबाजीत नववर्षाच्या पहिल्या क्षणाला कडकडून मिठी मारली.
तरुणींचेही जोरदार सेलिब्रेशन
नववर्ष स्वागतासाठी फुटाळा चौपाटी येथे आमदार प्रकाश गजभिये यांनी पोलीस - नागरिक नववर्ष स्वागत सोहळा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या अंतर्गत आयोजित आॅर्केस्ट्रा व डीजेवर रात्री ८.३० वाजतापासून ते रात्री १२ पर्यंत तरुणाई थिरकली. यात तरुणांसोबतच तरुणींचाही मोठा सहभाग होता. अपघाताची शक्यता लक्षात घेऊन गोवारी उड्डाण पूल आणि सक्करदरा उड्डाण पूल बंद ठेवण्यात आला होता.
रस्ते हाऊसफुल्ल
नववर्षाच्या स्वागताला घेऊन शंकरनगर चौक ते लॉ कॉलेज चौक हा मार्ग तरुणाईने फुलला होता. सोबतच धरमपेठ येथील ‘ट्रॅफिक पार्क’ मार्ग, व्हेरायटी चौक, सदर रोड, मेडिकल चौक, प्रतापनगर चौक, सक्करदरा मार्ग या परिसरात तरुणाई नववर्षाचे स्वागत करताना दिसून आली.