विचारांचा अमृत कलश घेऊन ठिकठिकाणचे सारस्वत आपापल्या गावांकडे
By नरेश डोंगरे | Published: February 6, 2023 03:27 PM2023-02-06T15:27:34+5:302023-02-06T15:28:07+5:30
विचारधनामुळे दोन्ही संमेलन श्रीमंत : चमक अन् चमकोगिरीचे कवित्व सुरू
नरेश डोंगरे
नागपूर : ब्रिटीश राजवटीविरुद्ध स्वातंत्र्याचा बिगुल फुंकणाऱ्या गांधी विनोबाच्या कर्मभूमीत एकीकडे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तर दुसरीकडे विद्रोही साहित्य संमेलनाची मशाल पेटली. या दोन्ही संमेलनात झालेली वैचारिक घुसळण अन् त्यातून बाहेर पडलेल्या विचारांचा अमृत कलश घेऊन ठिकठिकाणचे सारस्वत आपापल्या गावांकडे परतले. एका संमेलनाला लाभलेला राजाश्रय अन् दुसऱ्या संमेलनाची बांधिलकी आता कवित्व सुरू करून गेली आहे.
भक्कम वैचारिक उंचीच्या साहित्यीकांची उपस्थिती या दोन्ही संमलेनाच्या सर्वात मजबूत बाजू ठरल्या. त्यांनी उधळलेले विचारधन दोन्ही संमेलनाला अन् संमेलनात सहभागी झालेल्यांना श्रीमंत करणारे ठरले. त्यामुळे यात कोणते सरस अन् कोणते कमकुवत हा मुद्दाच चर्चेला नव्हता. परंतू संमलेनाला लाभलेल्या अर्थव्यवस्थेने दोन्हीकडची तुलना चर्चेला आणली. एकीकडे लोकवर्गणी अन् दुसरीकडे राज्यकर्त्यांसह व्यावसायिक मंडळींनी मुक्तहस्ते प्रवाहित केलेली अर्थगंगा या ज्ञानगंगेतील चमकदमक प्रदर्शीत करणारी ठरली.
विद्रोहित प्रत्येक जण घरातील लग्नकार्यासारखे स्वत:ला वाहून घेताना दिसले. केवळ स्वत:चे धनच नव्हे तर तन-मनसुद्धा खर्ची घालताना दिसले. त्यामुळे विद्रोही संमेलनाची चमक काहीशी वेगळी होती. ही चमक राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरीत वारंवार चर्चेला आली अन् काही आयोजकांचा अपवाद वगळता तिची मुक्तकंठाने प्रशंसाही झाली.
याऊलट दुसरीकडे चमकोगिरी जागोजागी दिसली. एक्स्पोर्ट केलेल्या तकलादू मंडळींच्या खांद्यावर संमेलनाच्या आयोजकांनी विविध जबाबदाऱ्या टाकल्या. त्यांची कुवत सोडा, चांगले करण्याची मानसिकताही नव्हती. स्वत:चे ब्रँडिंग करण्यासारखी त्यांची कृती असल्याने साहित्यिक, कवी, गझलकार अन् श्रोते या सर्वांचीच मानसिक ओढाताण झाली. अनेकांना प्रचंड मनस्तापही झाला. त्यामुळे आयोजकांना टिकेची झोडही सहन करावी लागली. त्याचमुळे सर्वकाही असताना अ. भा. मराठी साहित्य संमेलनातील चमक फिकी पडली अन् चमक तसेच चमकोगिरीतील फरकही स्पष्ट झाला.
बॉम्ब फुटले, ज्योती जळल्याच नाही
नावातच विद्रोह असला म्हणजे, बंडखोरी, वैचारिक लढा आलाच. मात्र, हा विद्रोह विचारांचा असून तो साहित्य तसेच समाज परिपक्व करण्यासाठी असल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे अहिंसेची पदोपदी जाणीव करून देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या नावाने उभारण्यात आलेल्या साहित्य नगरीतील आयोजकांशी संबंधित मंडळींनी चक्क अनुबॉम्ब फोडण्याचीच भाषा वापरली. विशेष म्हणजे, उद्घाटन सोहळ्याच्या वेळी समईतील ज्योतींनीही बराच वेळ पेटण्यास नकार दिला.
सारस्वतांना सुखावणारा पायंडा
या दोन्ही संमेलनाचे सर्वात चांगले फलित म्हणजे, अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी स्वत:च विद्रोहीच्या मंचावर जाऊन संमेलनाला दिलेल्या शुभेच्छा ठरावे. असे कधी झाले नसल्याने हा पायंडा भारतभरातीलच नव्हे तर देश-विदेशातील सारस्वतांनाही सुखावून टाकणारा ठरला.