धानाच्या पिकाला साड्यांचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:08 AM2021-09-19T04:08:49+5:302021-09-19T04:08:49+5:30
सज्जन पाटील लाेकमत न्यूज नेटवर्क मांढळ : कुही तालुक्यातील बहुतांश शिवारात वन्यप्राण्यांचा वावर आणि त्यांच्यामुळे पिकांचे नुकसानीचे प्रमाण वाढले ...
सज्जन पाटील
लाेकमत न्यूज नेटवर्क
मांढळ : कुही तालुक्यातील बहुतांश शिवारात वन्यप्राण्यांचा वावर आणि त्यांच्यामुळे पिकांचे नुकसानीचे प्रमाण वाढले आहे. या वन्यप्राण्यांपासून धानाच्या पिकाचे रक्षण करण्यासाठी कुही तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी शक्कल लढवीत संपूर्ण शेताभाेवताली जुन्या साड्या लावून शेताला कुंपण तयार केले आहे.
कुही तालुक्यातील मांढळ, वीरखंडी, चिकणा, तारणा, धामणा, ठाणा, डोंगरमौदा, पारडी या शिवारात वन्यप्राण्यांचा सर्वाधिक वावर असून, वन्यप्राणी या शिवारातील शेतात असलेले धान, कापूस, तूर, सोयाबीन, मिरची व इतर पिकांची प्रचंड नासाडी करीत असल्याने या भागातील शेतकरी त्रासले आहेत. या शेतकऱ्यांनी सुरुवातीला शेतात मचाण तयार करणे, शेतात रात्रभर शेकाेटी पेटविणे, विषारी सापांचा धाेका पत्करत रात्रभर जागली करणे यासह इतर उपाययाेजना केल्या, तरीही वन्यप्राणी काही ना काही प्रमाणात पिकांचे नुकसान करून जायचे.
या वन्यप्राण्यांपासून पिकांचा बचाव करण्यासाठी शेताच्या सभाेवताली लाकडी काड्या उभ्या करून त्याला साड्या बांधल्या व साड्यांचे कुंपण तयार केले. त्यामुळे वन्यप्राण्यांचा वावर पिकांचे नुकसान काहीसे कमी झाले, अशी माहिती मांढळ येथील प्रल्हाद वैद्य, वीरखंडी येथील मनोहर लोखंडे, चिकणा येथील केशव चव्हाण, पारडी येथील मनोज खवास यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी दिली.
...
१० ते १५ रुपयांत एक साडी
शेताला कुंपण करण्यासाठी खूप साड्या लागतात. एवढ्या साड्या घरी नसतात. त्यामुळे या जुन्या साड्या आपण नागपूर शहरातील एका व्यक्तीकडून १० ते १५ रुपये याप्रमाणे खरेदी केल्या. टेलरकडून त्या साड्या एकमेकांना जाेडून (शिऊन) घेतल्या. काड्यांच्या मदतीने त्या साड्यांचे शेताला कुंपण केले. या साड्यांना बघून रानडुकरं शेतात येण्याऐवजी पळून जातात, असेही शेतकऱ्यांनी सांगितले.