'सारी दुनियां का बोझ हम उठाते है', कुलींनी सांगितली गडकरींना व्यथा

By नरेश डोंगरे | Published: October 8, 2023 08:28 PM2023-10-08T20:28:39+5:302023-10-08T21:42:15+5:30

रेल्वेस्थानकावर कितीही गर्दी असू दे, तो चटकन दिसतो. मात्र, काम संपले की तो नजरेआड होतो.

Sari Duniyan Ka Boz Hum Uthate Hai the porter told nitin Gadkari in agony | 'सारी दुनियां का बोझ हम उठाते है', कुलींनी सांगितली गडकरींना व्यथा

'सारी दुनियां का बोझ हम उठाते है', कुलींनी सांगितली गडकरींना व्यथा

googlenewsNext

नागपूर: रेल्वेस्थानकावर कितीही गर्दी असू दे, तो चटकन दिसतो. मात्र, काम संपले की तो नजरेआड होतो. बहुतांश प्रवासी त्याला लगेच विसरूनही जातात. कष्टाचे जीवन जगणारा समजातील हा उपेक्षित घटक म्हणजे 'कुली'. गावभऱ्याचे ओझे डोक्यावर वाहणाऱ्या कुलींना पाहिजे त्या प्रमाणात परिश्रमाचा मोबदला मिळत नाही. त्याची ती व्यथा, महानायक अमिताभ बच्चन यांनी कुली चित्रपटातून समाजासमोर आणली. १९८३ ला चित्रपट प्रदर्शित झाला अन् सुपर डूपर हिट ठरला. 

'सारी दुनिया का बोझ हम उठाते है', या गीतासह पडद्यावरचा कुली प्रचंड लोकप्रिय झाला. प्रत्यक्षात रेल्वेस्थानकावर राबराब राबणाऱ्या कुलींच्या जीवनात मात्र फारसा बदल झाला नाही. तो आजही तुटपूंज्या कमाईत जीवन जगतो. नागपुरात सुमारे १५० कुली आहेत. रेल्वे स्थानकावर ते प्रवाशांच्या सेवेत तत्पर असतात. दिवसभर काम केल्यानंतर मोठ्या मुश्किलीने त्यांच्या कुटुंबियांची दोन वेळेच्या सांजेची सोय होते. असे असताना आता रेल्वेने पुन्हा नव्याने ५० कुलींची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच पुरेसे काम मिळत नाही, पुन्हा कुलींची संख्या वाढल्यास आणखी मारामार होईल, याची कल्पना आल्याने कुलींमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे येथे कुलींची भरती होऊ नये, असे लेखी, तोंडी सांगून, अर्ज विनंत्या करूनही रेल्वे प्रशासनाने त्यांना दाद दिली नाही. परिणामी अस्वस्थ झालेल्या १०० वर कुली बांधवांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कार्यालय गाठले. आधीच आम्हाला पुरेसा रोजगार मिळत नाही. त्यात रेल्वे अधिकाऱ्यांकडून 'नवीन कुली भरती'च्या रुपाने आमच्या पोटाला चिमटा घेण्याचे प्रयत्न चालविले आहे. पुन्हा कुलींची भरती झाल्यास 'एक अनार साै बिमार' अशी स्थिती होईल. तेव्हा तुम्ही आम्हाला न्याय द्या, अशी विनंती केली. त्याला गडकरींनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तुमच्यावर अन्याय होणार नाही, यासाठी मला जे करता येईल, ते करेन, असे गडकरी म्हणाले.

चाय तो बनती है...!
शंभरावर कुली भेटायला आल्याचे कळताच गडकरी स्वत:च कार्यालयाबाहेर आले आणि त्यांनी कुलींची व्यथा ऐकून घेतली. तत्पूर्वी कुलींना चहा देण्यात आला होता. चर्चेच्या वेळी पुन्हा एकदा 'चाय तो बनती है'म्हणत गडकरींनी कुलींसोबत चहा-पान केले. संघटनेचे अध्यक्ष अजय पाटील, महासचिव अब्दुल मजिद, अजय पाल, रामटेके, सोनू गायकवाड, राहुल टेंभूर्णे, प्रवीण नाखले, कुणाल गाैरखेडे यांची यावेळी उपस्थिती होती.
 

Web Title: Sari Duniyan Ka Boz Hum Uthate Hai the porter told nitin Gadkari in agony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.