‘सरोगसी रॅकेट’: नागपुरात पुन्हा एक धक्कादायक प्रकरण उजेडात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 10:44 AM2018-07-31T10:44:44+5:302018-07-31T10:49:23+5:30

उपराजधानीतील खळबळजनक ‘सरोगसी रॅकेट’ची वरिष्ठ पातळीवरून गंभीर दखल घेण्यात आली आहे. या प्रकरणातील नाजूक बाबी लक्षात घेता कसून मात्र गोपनीय पद्धतीने चौकशी करण्याचे संबंधितांना आदेश देण्यात आले आहेत.

'Sarogsi Racket': In Nagpur a shocking case again | ‘सरोगसी रॅकेट’: नागपुरात पुन्हा एक धक्कादायक प्रकरण उजेडात

‘सरोगसी रॅकेट’: नागपुरात पुन्हा एक धक्कादायक प्रकरण उजेडात

googlenewsNext
ठळक मुद्दे‘ रॅकेट’ची वरिष्ठ पातळीवरून दखल संबंधितांची धावपळ

नरेश डोंगरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीतील खळबळजनक ‘सरोगसी रॅकेट’ची वरिष्ठ पातळीवरून गंभीर दखल घेण्यात आली आहे. या प्रकरणातील नाजूक बाबी लक्षात घेता कसून मात्र गोपनीय पद्धतीने चौकशी करण्याचे संबंधितांना आदेश देण्यात आले आहे. दुसरीकडे लोकमतच्या वृत्ताची स्थानिकच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावर प्रसारमाध्यमांनी दखल घेतल्यामुळे तपास यंत्रणा आता अधिकच सक्रिय झाली आहे. तर, या प्रकरणात पोलिसांच्या रेकॉर्डवर आरोपी म्हणून ज्यांची नावे आली त्यांची धावपळही तीव्र झाली आहे. हे सर्व सुरू असतानाच या रॅकेटकडून पैशासाठी मानवी हक्क, संवेदना कशा चिरडल्या जात होत्या, त्याचे पुन्हा एक धक्कादायक प्रकरण पुढे आले आहे.
गरीब महिलांच्या असहायतेचा फायदा घेऊन त्यांना सरोगसी मदर बनविणाऱ्या आणि करारानुसार ठरलेली रक्कम देण्याऐवजी त्यांना धमक्या देणाऱ्या रॅकेटचे कुकृत्य लोकमतने उघडकीस आणल्यानंतर सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली. या प्रकरणी एका सरोगसी मदरची तक्रार नोंदवून घेत नंदनवन पोलिसांनी शनिवारी डॉ. चैतन्य शेंबेकर, डॉ. लक्ष्मी श्रीखंडे, डॉ. वर्षा ढवळे आणि डॉ. दर्शना पवार तसेच दलालाची भूमिका वठविणाऱ्या मनीष मुंधडा आणि त्याची पत्नी हर्षा या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मनीष मुंधडा आणि त्याची पत्नी हर्षा मुंधडा या दोघांना पोलिसांनी शनिवारी सायंकाळी अटक केली. तेव्हापासून उपराजधानीसह राज्यभरात प्रचंड खळबळ उडाली आहे. त्यांची चौकशी सुरू असतानाच लोकमतला पुन्हा धक्कादायक माहिती मिळाली. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खरबी, साईबाबानगरात राहणाऱ्या ३८ वर्षीय महिलेची ही कैफियत आहे. तिला १८ वर्षांची, १० वर्षांची मुलगी आणि १० वर्षांचा मुलगा आहे. तिची आर्थिक अवस्था अत्यंत हलाखीची आहे. मुलांचे शिक्षण आणि पालनपोषणाची तीव्र समस्या असल्यामुळे तिने बचत गटाचे कर्ज घेतले होते. आर्थिक कोंडीमुळे ती हे कर्ज फेडू शकली नाही.
कर्ज वसुलीचा तगादा लागल्यामुळे ती हवालदिल झाली. दुसरे कर्ज मिळवून बचत गटाच्या महिलेचे कर्ज चुकविण्यासाठी ती प्रयत्न करीत असताना दलालाच्या माध्यमातून आरोपी मुंधडा दाम्पत्याने तिला गाठले. एका बाळाचे चार लाख रुपये मिळतील, असे आमिष दाखवून तिच्या उदरात मंजू तिवारी नामक महिलेसाठी बाळ वाढविण्यासाठी तिला तयार करून घेतले. मुलगी वयात येत असताना आपल्या पोटात बाळ दिसल्यास समाज काय म्हणेल, असा प्रश्न तिच्यासमोर होता. मात्र, आर्थिक कोंडीमुळे तिने सगळं काही सहन करण्याची तयारी दर्शवली. सप्टेंबर २०१६ मध्ये तिच्यावर सरोगसी मदरची प्रक्रिया सुरू झाली. ‘एम्ब्रियो ट्रान्सफर’ झाले. आठव्या महिन्यात तिला व्यवस्थित औषधं मिळाली नाही.
त्यामुळे तिची प्रकृती खालावली. बाळाला धोका होऊ शकतो, हे ध्यानात आल्यामुळे महिलेच्या जीवाची पर्वा न करता रॅकेट संचलित करणाऱ्यांनी तिची २७ एप्रिल २०१७ प्रसूती (सीझर) करून घेतली. त्यानंतर चार दिवसातच तिची सुटी करण्यात आली. तोपर्यंत मुंधडामार्फत तिला केवळ एक लाख रुपये मिळाले होते.

सर्वत्र लोकमतचीच चर्चा
लोकमतने तत्पूर्वीच सरोगसी रॅकेटचा पर्दाफाश करून सर्वत्र खळबळ उडवून दिली. लोकमतच्या वृत्ताची प्रसारमाध्यमांनी रविवारी दखल घेतली. त्यानंतर बहुतांश प्रमुख वृत्तवाहिन्या आणि वृत्तसंस्थांनीही पोलिसांकडे चौकशी करून लोकमतचे वृत्त उचलून धरले. सोशल मीडियावरही लोकमतच्या वृत्ताचीच तीन दिवसांपासून चर्चा आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरूनही त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. या प्रकरणात आतापावेतो काय तपास झाला, ते जाणून घेण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांच्याकडून या प्रकरणाची बारीकसारीक माहिती घेतली. त्यांना या प्रकरणाची कसून मात्र गोपनीय पद्धतीने चौकशी करण्यास सांगण्यात आले. विशेष म्हणजे, उपायुक्त भरणे यांनी ज्या पद्धतीने या प्रकरणाची दखल घेतली, त्याबद्दल समाजातील विविध घटकांकडूनही त्यांचे कौतुक केले जात आहे.

सरोगसी मदर आणि रुग्णालयाचा व्यवहारिक संबंध कधीच येत नाही. मुळात ज्या दाम्पत्याला बाळ हवे असते ते आणि सरोगेट मदर्स यांच्यात करार होतो. आम्ही केवळ क्लिनिकल जबाबदारी पार पाडतो. त्यामुळे सरोगेट मदर्सवर उपचार करणे आणि तिचे बाळंतपण सुखरूप करून देणे एवढीच आमची जबाबदारी असते. मुळात या प्रकरणात आम्हाला गोवण्यात येत आहे. माझा सरोगसी मदर्सने केलेल्या आरोपाशी काहीएक संबंध नाही.
- डॉ.लक्ष्मी श्रीखंडे

मंजू मर गयी, अब काहेका पैसा?
बाळंतपण होताच बाकी सर्व रक्कम एकमुस्त देण्याचे ठरले होते. मात्र, बाळंतपण झाल्यानंतर उदरातील बाळाला काही क्षण बघण्याचीही मुभा न देण्याचा करंटेपणा दाखवणाऱ्या या आरोपींनी तिला पैशाची मागणी करताच काही दिवस टोलविले. पुढच्या आठवड्यात देतो, चार दिवसात देतो, असे सांगणाऱ्या मुंधडाने नंतर एक दिवस तिला भलतेच काही सांगितले. ज्या महिलेला तुझे बाळ दिले ती मंजू मृत झाली. त्यामुळे आता पैसे कसे मिळेल, असे विचारत झिडकारण्याचा प्रयत्न केला.

मुलीला उचलून नेण्याची धमकी
पैशाची तीव्र आवश्यकता असल्याने महिला उर्वरित तीन लाखांची रक्कम मिळावी म्हणून मुंधडाकडे वारंवार संपर्क करीत होती. मात्र, तिला रक्कम देण्याऐवजी मुंधडा आणि त्याच्या साथीदाराने २२ जुलै २०१८ ला धमकी दिली. ‘तेरी लडकी को उठाके, उससे ..... करेंगे’, असे म्हणत तिचा आवाज दाबला. यामुळे पीडित महिला प्रचंड दडपणात आली. तिची व्यथा ऐकून सामाजिक कार्यकर्त्यांनी नंदनवन पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला. पोलिसांकडून न्याय मिळणार नाही, याची प्रचिती आल्याने तिला पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांच्याकडे पाठविले. उपायुक्त भरणे यांनी तिच्या तक्रारीची गंभीर दखल घेतली.

Web Title: 'Sarogsi Racket': In Nagpur a shocking case again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :crimeगुन्हे