सरपंचांनी वाचला जि.प. अध्यक्षांपुढे समस्या पाढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:09 AM2020-12-22T04:09:34+5:302020-12-22T04:09:34+5:30
देवलापार : गावपातळीवर काम करताना सरपंचांना येणाऱ्या विविध अडचणींचा पाढा सरपंच सेवा संघातर्फे जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे यांच्यापुढे ...
देवलापार : गावपातळीवर काम करताना सरपंचांना येणाऱ्या विविध अडचणींचा पाढा सरपंच सेवा संघातर्फे जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे यांच्यापुढे वाचण्यात आला. जिल्हा परिषदेच्या आबासाहेब खेडकर सभागृहात सरपंच सेवा संघटनेच्या नागपूर जिल्हाध्यक्ष नलिनी शेरकुरे यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तीत सरपंचाची निवड ही थेट जनतेतून व्हावी, या विषयावर जि.प. प्रशासनाने सरकारचे लक्ष वेधण्याचे आवाहन केले. १५ व्या वित्त आयोगातून संगणक परिचालकाचे मानधन कंपनीला देण्यास सर्व सरपंचांनी नकार दिल्याचा प्रस्ताव यावेळी मंजूर करण्यात आला. १५ व्या वित्त आयोगातून संगणक परिचालकाचे मानधन जिल्हा परिषदेमार्फत करण्याचा प्रस्ताव अध्यक्षांमार्फत सरकारदरबारी मांडण्याचे याप्रसंगी निश्चित करण्यात आले. मनरेगा योजनेंतर्गत विविध कामांचा आढावा घेण्यासाठी पंचायत समितीतर्फे सरपंच मार्गदर्शन शिबिर आयोजित करणे, गावपातळीवरील जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती बरखास्त करून सरपंचांची शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करणे, गावपातळीवरील अति आवश्यक असलेल्या गरजूंना प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास, शबरी आवास, पारधी आवास, घरकुल योजनेंतर्गत तात्काळ मंजुरी देण्यात यावी, आदी विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. याप्रसंगी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष भुनेश्वर चाफले, आतिश पवार, बलवंतजी पडोळे, नीता पोटफोडे, पवन ताजने, प्रा. हेमराज चोखांद्रे आणि विविध ग्राम पंचायतचे सरपंच उपस्थित होते.