सदस्यांमधून होणार सरपंचांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:25 AM2020-12-14T04:25:21+5:302020-12-14T04:25:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक विभागाने जाहीर केला आहे. यावेळी सरंपचांची निवड ही पारंपरिक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक विभागाने जाहीर केला आहे. यावेळी सरंपचांची निवड ही पारंपरिक पद्धतीने म्हणजे सदस्यांमधून होणार आहे. थेट जनतेमधून सरपंच निवडीचा कायदा रद्द करण्यात आल्याने, शिक्षणाची अटही रद्द झाली आली. त्यामुळे अशिक्षित व्यक्तीही आता सरपंच होऊ शकतील.
मागच्या भाजपच्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र ग्रामपंचायतच्या कायद्यात दुरुस्ती करून सरपंचाची थेट जनतेमधून निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात दोन वर्षे सरपंचावर अविश्वास प्रस्ताव न आणण्याची अट घालण्यात आली होती. त्याच प्रमाणे ७ वा वर्ग पासची अटही घालण्यात आली होती. त्यावेळी याला बराच विरोध झाला. परंतु सरकार आपल्या निर्णयावर ठाम राहिली. नंतर झालेल्या निवडणुकीत सत्ता परिवर्तन झाले आणि राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार आले. सत्ता बदल होतात थेट सरपंच निवडीचा निर्णयही रद्द करण्यात आला. सरपंचाची निवड पूर्वीप्रमाणे म्हणजे सदस्यांमधून करण्याची दुरुस्ती कायद्यात करण्यात आली. कोरोनामुळे ग्रामपंचायतसह सर्वच निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. पुढे ढकलण्यात आलेल्या सर्व ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. आता निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. राज्यात १५ हजारावर ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होणार असून, यात नागपूर जिल्ह्यातील १३० ग्रामपंचायतींचा समावेश आहे. १५ जानेवारीला मतदान होणार असून, १८ जानेवारीला मतमोजणी होईल. मतमोजणीनंतर सरपंचपदासाठी निवडणूक होईल. सदस्यांमधूनच सरपंच आणि उपसरपंच यांची निवड केली जाईल.