सरसंघचालक आले ‘ट्विटर’वर!, संघाचे वरिष्ठ पदाधिकारीदेखील झाले ‘सोशल’
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2019 02:33 AM2019-07-02T02:33:16+5:302019-07-02T02:33:33+5:30
संघाचे अधिकृत ‘ट्विटर हँडल’ आहे. याशिवाय ‘फेसबुक’वरदेखील संघाचे अधिकृत ‘पेज’ आहे.
नागपूर : सरसंघचालक मोहन भागवतट्विटरवर आले असून पाठोपाठ संघाच्या सहा ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी देखील ट्विटरवर अकाऊंट उघडले आहे.
संघाचे अधिकृत ‘ट्विटर हँडल’ आहे. याशिवाय ‘फेसबुक’वरदेखील संघाचे अधिकृत ‘पेज’ आहे. मात्र, सरसंघचालक हे आजवर ‘सोशल मीडिया’वर कधीही दिसले नाहीत. त्यांच्यासह संघाचे पदाधिकारी ‘सोशल मीडिया’वर सक्रिय का नाहीत, असा प्रश्न अनेकदा उपस्थित व्हायचा. अखेर स्वयंसेवकांची ही प्रतीक्षा संपली आहे. त्यांच्या ‘टिष्ट्वटर अकाऊंट’ने ही कसर भरून काढली आहे.
सरसंघचालकांसह सरकार्यवाह भय्याजी जोशी, सहसरकार्यवाह
सुरेश सोनी, डॉ.कृष्ण गोपाल, व्ही.भागय्या, अखिल भारतीय प्रचार प्रमुख अरुण कुमार, अखिल भारतीय संपर्क प्रमुख अनिरुद्ध देशपांडे यांनीदेखील ‘टिष्ट्वटर’वर खाते उघडले आहे.
केवळ संघाला ‘फॉलो’
डॉ. मोहन भागवत यांनी ‘ट्विटरवर’वर अद्यापपर्यंत एकही पोस्ट टाकलेली नाही. असे असले तरी, त्यांचे ट्विटरवर अकाऊंट सुरू होताच त्यांना तब्बल पाच हजारांहून अधिक लोकांनी फॉलो करणे सुरू केले आहे. मात्र, खुद्द मोहन भागवत हे केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘ट्विटरवर हँडल’ला ‘फॉलो’ करताना दिसून येत आहेत.
‘फेक अकाऊंट’ला बसणार आळा
संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या नावे ‘ट्विटरवर’वर अनेक ‘फेक अकाऊंट्स’ सुरू होते. यामुळे नेटीझन्ससह सामाजिक वर्तुळात संभ्रम निर्माण होत होता. अशा प्रकारांना आळा बसावा यामुळे सर्व पदाधिका-यांचे अधिकृत ‘अकाऊन्ट्स’ सुरू करण्यात आले आहे. ते ‘सोशल मीडिया’वर आले आहेत, याचा अर्थ ते येथे नियमित ‘पोस्ट’ करतील असा होत नाही, अशी माहिती संघाच्या एका पदाधिका-याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.