"OTT प्लॅटफॉर्ममुळे तरुणांवर वाईट परिणाम"; नियंत्रणासाठी कायदा करण्याची सरसंघचालकांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2024 10:22 AM2024-10-12T10:22:43+5:302024-10-12T10:22:56+5:30
सिंगल युझ प्लास्टिकचा वापर बंद करण्याचे आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे.
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी सोहळ्यात एकीकडे सरसंघचालक ड़ॉ.मोहन भागवत यांनी देशासमोरील विविध समस्यांकडे लक्ष वेधत असताना समाजातील विकृती व कुसंस्कारांवरदेखील भाष्य केले. विशेषतः ओटीटी प्लॅटफॉर्मच्या कंटेटवर त्यांनी चिंता व्यक्त केली. ओटीटी प्लॅटफॉर्मवर नियंत्रण आवश्यक असून त्याबाबत कायदा करायला हवा, असे ते म्हणाले.
ओटीटी प्लॅटफॉर्मवर बिभत्सचेचे प्रदर्शन होते. त्याच्याबाबत कायदा हवेत, त्यानेच नियंत्रण येईल. ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे तरुण पिढीवर वाईट परिणाम होत आहे, असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी पर्यावरणाच्या समस्येवरदेखील उद्बोधन केले. पर्यावरणामुळे ऋतूचक्र पालटत आहे. पर्यावरणाबाबत अपुरा दृष्टीकोन आहे. आपण जगाचे अंधानुकरण केले व त्यामुळे पर्यावरणाच्या विविध समस्या निर्माण झाल्या. आपल्या जैविक शेतीसारख्या पारंपारिक पद्धतींचा जीवनप्रणालीत समावेश करावा लागेल. पाणी वाचविण्यावर भर दिला पाहिजे. तसेच सिंगल युझ प्लास्टिकचा वापर बंद करायला हवा, याकडे त्यांन लक्ष वेधले.
समाजातील प्रत्येक घटक, धर्मातील लोकांशी मित्रता असायला हवी. आपण विषमतेमुळे संत-महात्मा यांचे अक्षरशः समाजांमध्ये वाटप केले आहे. सर्व महापुरुषांशी निगडीत उत्सव सर्वांनी मिळून साजरे करायला हवे. मंदीर, पाणवठे, स्मशान सर्वांसाठी खुले असले पाहिजे. त्यावर काम झाले पाहिजे. दुर्बल जातींसाठी सर्वांनी एकत्रित काम करायला हवे असेदेखील ते म्हणाले.