सारथीचा मानपत्र वितरण सोहळा ६ जानेवारीला
By admin | Published: January 3, 2016 03:33 AM2016-01-03T03:33:59+5:302016-01-03T03:33:59+5:30
लघु उद्योग व सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या सारथी या संस्थेतर्फे दरवर्षी देण्यात येणारे सारथी पुरस्कार जाहीर करण्यात आले असून ...
नागपूर : लघु उद्योग व सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या सारथी या संस्थेतर्फे दरवर्षी देण्यात येणारे सारथी पुरस्कार जाहीर करण्यात आले असून येत्या ६ जानेवारीला होणाऱ्या समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव डॉ. अनिरु द्ध वझलवार यांनी पत्रपरिषदेत दिली.
उद्योग व वाणिज्य, कला व संस्कृती आणि क्रीडा क्षेत्रात मोठे यश गाठलेल्या विदर्भातील व्यक्तींना सारथीच्या पुरस्काराने गेल्या २३ वर्षापासून सन्मानित करण्यात येत आहे. यावर्षीही विदर्भाच्या मातीत जन्मलेल्या किंवा येथे काही काळ घालविलेल्या अशाच गुणवंतांना सारथी मानपत्राने सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये उद्योग क्षेत्रातून ए.के. गांधी ग्रुप आॅफ कंपनीज्चे अशोक गांधी आणि विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चरचे व्यवस्थापकीय संचालक अरुण लाखाणी यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. क्रीडा क्षेत्रातून स्विमिंगपटू प्रभाकर साठे आणि बुद्धिबळपटू स्वप्नील धोपाडे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. प्रभाकर साठे यांनी स्विमिंगमध्ये अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व केले असून १४४ सुवर्ण, ५२ रौप्य व २६ कांस्य पदके पटकाविली आहेत. दुसरीकडे स्वप्नील धोपाडे याने एक उदयोन्मुख बुद्धिबळपटू म्हणून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपली छाप सोडली आहे. कला व संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये ज्येष्ठ मूर्तिकार श्रीराम इंगळे यांना सारथी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय कृषी क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल कृषितज्ज्ञ डॉ.सी.डी. मायी तसेच अटल बहादूर सिंह यांना सारथी परिवार अवॉर्डने सन्मानित करण्यात येणार आहे. कुसुमताई वानखेडे सभागृह, उत्तर अंबाझरी मार्ग येथे बुधवारी सायंकाळी ५.४५ वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असून मेजर जनरल अजित हरी गद्रे आणि बैद्यनाथ ग्रुपचे सुरेश शर्मा आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. पत्रपरिषदेला सारथीचे चेअरमेन डॉ. सुरेश चांडक, सचिव अमर वझलवार, राजेंद्र राठी, डॉ. मधुकर आपटे, सुधीर एकबोटे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)