सत्यशोधाची तळमळ विधिज्ञांनी कायम बाळगावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 12:47 AM2017-07-30T00:47:18+5:302017-07-30T00:48:02+5:30

satayasaodhaacai-talamala-vaidhaijanaannai-kaayama-baalagaavai | सत्यशोधाची तळमळ विधिज्ञांनी कायम बाळगावी

सत्यशोधाची तळमळ विधिज्ञांनी कायम बाळगावी

Next
ठळक मुद्देन्यायमूर्ती एस. ए. बोबडे : जी.एल. सांघी स्मृती व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ज्ञानाची साधना अखंडित प्रक्रिया असून विविध प्रश्नांची उकल करण्यासाठी आणि सत्याचा शोध घेऊन ते मांडण्याची तळमळ विधिज्ञांनी सतत बाळगावी, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलपती एस. ए. बोबडे यांनी केले.
महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर, यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ येथे पहिल्या जी. एल. सांघी स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. यावेळी न्यायमूर्ती एस. ए. बोबडे बोलत होते. याप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती बी. पी. धर्माधिकारी, दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विपिन सांघी, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विजेंदर कुमार व्यासपीठावर उपस्थित होते.
महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. विजेंदर कुमार म्हणाले, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ मानांकनाचे विविध टप्पे गाठत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी विविध व्याख्याने, परिषदा तसेच चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येत आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती बी. पी. धर्माधिकारी म्हणाले, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ कायदे क्षेत्रातील अग्रगण्य शिक्षण संस्था सिद्ध होत आहे. न्यायसंस्थेकडे नेहमीच विविध प्रश्नांची सोडवणूक करणारी व्यवस्था म्हणून पाहिले जाते. विविध तत्त्वज्ञानातील शिकवणींचा गाभा महत्त्वपूर्ण असून ही शिकवण मोकळ्या मनाने आणि बुद्धीने स्वीकारली पाहिजे. असेही न्या. धर्माधिकारी यांनी सांगितले.
दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विपीन सांघी यांनी जी. एल. सांघी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. संचालन प्रा. डॉ. मेधा दीक्षित यांनी केले. महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे व्यवस्थापक डॉ. एन. एम. साकरकर यांनी आभार मानले. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, न्यायमूर्ती आर. के. देशपांडे, न्यायमूर्ती एम. एस. संकलेचा, न्यायमूर्ती पी. एन. देशमुख, न्यायमूर्ती एस. बी. शुक्रे, न्यायमूर्ती ए. एस. चांदूरकर, न्यायमूर्ती व्ही. एम. देशपांडे, न्यायमूर्ती इंदिरा जैन, न्यायमूर्ती स्वप्ना जोशी, न्यायमूर्ती रोहित देव, न्यायमूर्ती मनीष पितळे तसेच विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक व मान्यवर उपस्थित होते.

विधिज्ञांनी चतुरस्र असावे
न्यायमूर्ती एस. ए. बोबडे म्हणाले, कायद्याच्या व्यवसायाचे क्षेत्र सर्वच विषयांशी निगडित असते. त्यामुळे कायदे क्षेत्रातील व्यावसायिकांनी, विधिज्ञांनी चतुरस्र असणे गरजेचे असते. कारण त्यांच्यासमोर सोडवणुकीसाठी नेहमीच विविध विषयातील क्लिष्ट प्रश्न समोर येत असतात. या सर्वांची उकल करण्यासाठी विधिज्ञांनी माहिती तंत्रज्ञानासह विविध विषयातील ज्ञान संपादित करणे आवश्यक ठरते. विधिज्ञांनी न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहावे व या प्रक्रियेत तत्त्वाशी तडजोड कधीही करू नये. विधिज्ञांनी समाजाबद्दल कृतज्ञता बाळगत समाज, न्यायालय आणि पक्षकारांशी कायम निष्ठा बाळगावी. विविध प्रकरणांमध्ये विश्लेषणात्मक दृष्टिकोन जागृत ठेवून माहिती आणि ज्ञानाबरोबरच मानवी स्वभावातील नैसर्गिक क्रिया-प्रतिक्रियांचे भानही बाळगावे असेही न्या. बोबडे यांनी सांगितले.

Web Title: satayasaodhaacai-talamala-vaidhaijanaannai-kaayama-baalagaavai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.