सतीश गोगुलवार यांना राष्ट्रीय मानवाधिकार पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 11:37 AM2020-02-28T11:37:03+5:302020-02-28T11:37:44+5:30
कुरखेडा (जि. गडचिरोली) येथील ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या स्वयंसेवी संस्थेचे संचालक डॉ. सतीश गोगुलवार यांना यवतमाळ येथील डॉ. व्ही. एम. पेशवे सामाजिक संशोधन संस्थेने यंदाचा राष्ट्रीय मानवाधिकार पुरस्कार जाहीर केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुरखेडा (जि. गडचिरोली) येथील ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या स्वयंसेवी संस्थेचे संचालक डॉ. सतीश गोगुलवार यांना यवतमाळ येथील डॉ. व्ही. एम. पेशवे सामाजिक संशोधन संस्थेने यंदाचा राष्ट्रीय मानवाधिकार पुरस्कार जाहीर केला आहे.
येत्या २२ मार्चला होणाऱ्या ‘आरोग्य आणि मानवी हक्क’ या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेमध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. २५ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. संस्थेच्या वतीने दिला जाणारा हा आठवा पुरस्कार आहे. डॉ. राम बुटले, डॉ. राम जाधव आणि संदीप तुंडूरवार यांनी या पुरस्काराची घोषणा केली.
डॉ. व्ही. एम. पेशवे हे यवतमाळ येथील अमोलकचंद महाविद्यालयामधून प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झाले. संशोधन आणि मानवाधिकार हे त्यांच्या अध्यापनाचे क्षेत्र होते. त्यांच्या स्मृतीनिमित्त विद्यार्थी वर्गाकडून दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. यंदा नागपुरात ‘आरोग्य आणि मानवी हक्क’ या विषयावर संस्थेच्या वतीने आणि यशोदा गर्ल्स कला व वाणिज्य महाविद्यालयाकडून परिषद होत आहे. यात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.