सतीश गोगुलवार, शुभदा देशमुख यांना राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 11:26 PM2019-06-05T23:26:25+5:302019-06-05T23:27:20+5:30
‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या चळवळीच्या माध्यमातून गेल्या साडेतीन दशकापासून गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींच्या आरोग्याकरिता कार्य करीत असलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. सतीश गोगुलवार आणि शुभदा देशमुख यांना यंदाचा डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार त्यांना जुलैमध्ये प्रदान केला जाईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या चळवळीच्या माध्यमातून गेल्या साडेतीन दशकापासून गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींच्या आरोग्याकरिता कार्य करीत असलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. सतीश गोगुलवार आणि शुभदा देशमुख यांना यंदाचा डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार त्यांना जुलैमध्ये प्रदान केला जाईल.
सी. मो. झाडे फाऊंडेशनद्वारे संचालित सत्यनारायण नुवाल गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्राच्यावतीने देशात सर्वोत्तम सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थेला दरवर्षी या पुरस्काराने गौरविण्यात येते. एक लाख रुपये व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. या पुरस्काराची सुरुवात २०१३ मध्ये झाली. आतापर्यंत दिल्लीतील ज्येष्ठ गांधीवादी डॉ. एस. एन. सुब्बाराव, पुण्यातील ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी, दिल्लीतील कर्मयोगी रवी कालरा, धारणी मेळघाटमधील ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवी कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे, गुवाहाटीच्या अर्थतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अलका सरमा, सरहदचे संस्थापक संजय नहार यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असे फाऊंडेशनचे विश्वस्त नारायण समर्थ यांनी कळविले.