सतीश उके हे देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थी अर्जावर उत्तर सादर करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:07 AM2021-06-11T04:07:26+5:302021-06-11T04:07:26+5:30
नागपूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री व वर्तमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोनेगाव येथील एका खुनासंदर्भातील याचिकेत दाखल केलेल्या ...
नागपूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री व वर्तमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोनेगाव येथील एका खुनासंदर्भातील याचिकेत दाखल केलेल्या मध्यस्थी अर्जावर याचिकाकर्ते अॅड. सतीश उके उत्तर सादर करणार आहेत. त्यांनी गुरुवारी याकरिता वेळ मागितल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या प्रकरणावरील सुनावणी २३ जूनपर्यंत तहकूब केली.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. १२ जून २०१४ रोजी सोनेगाव परिसरात एका मुलीचा मृतदेह आढळून आला होता. सोनेगावचे तत्कालीन पोलीस निरीक्षक व इतर पोलीस अधिकाऱ्यांनी फडणवीस यांच्या दबावामुळे त्या प्रकरणातील आरोपींना वाचवण्यासाठी कायद्यानुसार तपास केला नाही, असा उके यांचा आरोप आहे. फडणवीस यांनी हा आराेप फेटाळून लावला आहे. ही याचिका वाईट हेतूने दाखल करण्यात आली असल्यामुळे आवश्यक बाजू मांडण्याची संधी मिळावी यासाठी याचिकेत प्रतिवादी करून घेण्यात यावे, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे. या विनंतीवर उके यांचे उत्तर आल्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे. उके यांनी त्यांची बाजू स्वत: मांडली तर, फडणवीस यांच्यावतीने अॅड. अथर्व मनोहर यांनी कामकाज पाहिले.
--------
सरकारचे उत्तर आले नाही
न्यायालयाने गेल्या ६ मे रोजी राज्य सरकारला नोटीस बजावून उके यांच्या याचिकेवर १० जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला होता. परंतु, सरकारने पुन्हा वेळ वाढवून मागितली. त्यामुळे न्यायालयाने सरकारला पुढील तारखेपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले.