नागपुरात राजपत्रित अधिकाऱ्यांचे अनोखे आंदोलन; खूर्चीऐवजी सतरंजीवर बसून केली कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2022 04:07 PM2022-06-23T16:07:52+5:302022-06-23T16:26:28+5:30
आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक न्याय विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेने गुरुवारपासून सतरंजी आंदोलन सुरु केले आहे.
नागपूर : वेतनश्रेणी, पदोन्नतीसह आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक न्याय विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेने गुरुवारपासून सतरंजी आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनांतर्गत राजपत्रित अधिकाऱ्यांनी आपल्या खूर्चीवर न बसता सतरंजीवर बसून प्रशासकीय कामे पार पाडली.
सामाजिक न्याय विभागात अनेक वर्षांपासून प्रतिनियुक्तीवर अधिकारी पाठवले जातात. मात्र या विभागातील मुळ अधिकाऱ्यांना पदोन्नती दिली जात नाही, त्यामुळे अधिकारी वर्गात प्रचंड असंतोष आहे. शासनाकडे यासंदर्भात अनेकदा निवेदने देण्यात आली, परंतु शासनाकडून दुर्लक्ष होत गेले. त्यामुळे अधिकारी अधिकच संतप्त झाले. शेवटी राजपत्रित अधिकारी संघटनेने पुन्हा एकदा शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आगळेवेगळे असे सतरंजी आंदोलन पुकारले आहे. यात सामाजिक न्याय विभागातील सर्व राजपत्रित अधिऱ्यांनी आपापल्या कार्यालयात खुर्चीवर न बसता खाली सतरंजी टाकून प्रशासकीय कामे पार पाडली.
सामाजिक न्याय विभागातील सहायक आयुक्तांच्या वेतनश्रेणीत वाढ करण्यात यावी, सहआयुक्त व अतिरिक्त आयुक्त पदावर पदोन्नती देण्यात यावी, समिती व विभागाच्या बळकटीकरणासाठी समाजकल्याणमधून सहा अध्यक्षपदे भरण्यात यावी, प्रशसकीय रचना सुधारावी,राजपत्रित अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्यात यावी, समाजकल्याण विभागात प्रतिनियुक्तीवर अधिकारी पाठवू नये आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.