चळवळीचे सत्यशोधक ताराचंद्र खांडेकर

By admin | Published: August 28, 2014 02:03 AM2014-08-28T02:03:12+5:302014-08-28T02:03:12+5:30

जीवनभर आंबेडकरी निष्ठा व बाण्याने जगलेले, तारांचद्र खांडेकर हे खऱ्या अर्थाने आंबेडकरी चळवळीचे संदर्भपुरुष आहेत. त्यांचे संदर्भ वाचून, आत्मसात करून चळवळीतील अनेक नेते मोठे झाले.

Satyashodhak Tara Chandra Khandekar of the movement | चळवळीचे सत्यशोधक ताराचंद्र खांडेकर

चळवळीचे सत्यशोधक ताराचंद्र खांडेकर

Next

अमृत महोत्सवर्षी अभीष्टचिंतन सोहळा : वक्त्यांचे गौरवोद्गार
नागपूर : जीवनभर आंबेडकरी निष्ठा व बाण्याने जगलेले, तारांचद्र खांडेकर हे खऱ्या अर्थाने आंबेडकरी चळवळीचे संदर्भपुरुष आहेत. त्यांचे संदर्भ वाचून, आत्मसात करून चळवळीतील अनेक नेते मोठे झाले. इतरांवर वैचारिक कुरघोडी करण्याचे बळ कार्यकर्त्यांना मिळाले. आंबेडकरी चळवळीचे ते खऱ्या अर्थाने सत्यशोधक आहेत, असे प्रतिपादन लाँगमार्चचे प्रणेते आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केले.
आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, ज्येष्ठ विचारवंत व समीक्षक ताराचंद्र खांडेकर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त झांशी राणी चौकातील मोरभवन येथील मधुरम सभागृहात त्यांचा अभीष्टचिंतनाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात प्रा. कवाडे बोलत होते. याप्रसंगी ताराचंद्र खांडेकर यांचा शाल, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.
चळवळीची निर्भीडता प्रखरतेने, बिनधास्तपणे मांडून त्यांनी आंबेडकरी विचारांची कास आजतागायत कायम ठेवली आहे. माणूस पैशाने श्रीमंत होतो, मनाने श्रीमंत असणारी माणसे शोधण्यासाठी पावले पदोपदी झिजवावी लागतात. एकत्र आलेला समाज विचार करतो आणि जो समाजक्रांती करतो त्याचा विजय होतो. खांडेकरांनी अशाच समाजाचा विचार जपला, असे मत प्रा. कवाडे यांनी व्यक्त केले. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले, कोणत्याही प्रगतीची वाट ही कुटुंबापुरती मर्यादित नसते. त्याचा समाजाशी संबंध असतो. प्रतिकूल परिस्थिती अनुकूल करण्याची ताकद असामान्य व्यक्तीमध्येच असते.
खांडेकर यांचे व्यक्तिमत्त्वसुद्धा असेच असल्याने त्यांच्या कर्तृत्वगुणांचा हा सोहळा आहे. आंबेडकरी चळवळीशी कायम एकनिष्ठता जपून सामाजिक बांधिलकीतून माणुसकीचा धागा जोडणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना ओळखले जाईल.
भदंत विमलकीर्ती गुणसिरी म्हणाले, बुद्धिमान समाज म्हणून विचारवंतांवर महत्त्वाची जबाबदारी असते. तेव्हा साहित्याची चळवळ थांबू नये, ही अपेक्षा आहे. अनुसूचित जाती व जनजाती आयोगाचे अध्यक्ष सी.एल. थूल यांनी खांडेकरांच्या वैचारिक व साहित्यिक कार्यावर प्रकाश टाकला. मेडिकलचे कर्करोग विभागप्रमुख डॉ. कृष्णा कांबळे म्हणाले, अनेकजण जगतात. केवळ चालतात. डोक्याने विचार करीत नाही. जो विचार करतो त्याचेच अभीष्टचिंतन होते. खांडेकरांनी विचारांशी तडजोड केली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
व्यासपीठावर खांडेकर यांच्या पत्नी अस्मिता खांडेकर, मारोतराव कांबळे उपस्थित होते. बबन चहांदे यांनी खांडेकर यांचा परिचय करून दिला. इ.मो. नारनवरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. नीरजबोधी यांनी संचालन केले. डॉ. सुचित बागडे यांनी आभार मानले.
याप्रसंगी डॉ. भाऊ लोखंडे, भीमराव वैद्य, डॉ. प्रदीप आगलावे, डॉ. मालती बोदोले, प्रा. तुळसा डोंगरे, नरेश वाहाणे, प्रवीण मानवटकर, का.रा. वालदेकर, अ‍ॅड. रमेश शंभरकर, विजय चिकाटे, डॉ. अनिल हिरेखण, बंटी उके, प्रकाश बन्सोड, बबन बोंदाटे, डॉ. शंकर खोब्रागडे, डॉ. एन.डी. पाटील, डॉ. सुहास कानफाडे यांच्यासह समाजातील नागरिक व चळवळीतील कार्यकत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (प्रतिनिधी)

Web Title: Satyashodhak Tara Chandra Khandekar of the movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.