सावनेरात ‘चक्का जाम’

By admin | Published: February 13, 2017 02:41 AM2017-02-13T02:41:44+5:302017-02-13T02:41:44+5:30

मध्य प्रदेश परिवहनच्या बसचालकाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसचालकास क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण केली.

Savarkar 'Chakka Jam' | सावनेरात ‘चक्का जाम’

सावनेरात ‘चक्का जाम’

Next

बसचालकास मारहाण : कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे बसस्थानकात तणाव
सावनेर : मध्य प्रदेश परिवहनच्या बसचालकाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसचालकास क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण केली. या घटनेचे लगेच पडसाद उमटले आणि एसटी कर्मचाऱ्यांनी या घटनेच्या निषेधार्थ ‘चक्का जाम’ आंदोलनाला सुरुवात केली. ही घटना सावनेर बसस्थानकात रविवारी सकाळी ८.४५ वाजताच्या सुमारास घडली. या आंदोलनामुळे बहुतांश बसेस आगारात अडकून पडल्याने प्रवाशांचे हाल झाले.
भिवंडी येथे एसटी बसचालकास काही रिक्षेवाल्यांनी मारहाण केली आणि त्यानंतर त्या बसचालकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच सावनेर आगारात बसचालकास मारहाण केल्याची घटना घडल्याने एसटीचे कर्मचारी आक्रमक झाले होते. मध्य प्रदेश परिवहनच्या बसचालकाने एमपी-२८/पी-१०६२ क्रमांकाची बस सावनेर बसस्थनकानाच्या आवारातील सुलभ शौचालयाच्या समोर उभी केली होती. वास्तवात, मध्य प्रदेश परिवहनच्या बसेस या बसस्थानकाच्या आवारातच दुसरीकडे उभ्या केल्या जातात. दरम्यान, एमएच-४०/एन-९५४१ क्रमांकाची एसटी महामंडळाची बस बसस्थानकाच्या आवारात आल्यानंतर बसचालकाने ही बस मध्य प्रदेश परिवहनच्या बसच्या मागे उभी केली. त्यातच एसटी बसचालक जी. आर. पठाने यांनी मध्य प्रदेश परिवहनच्या बसचालकास येथे त्याने बस का उभी केली, अशी सहज विचारणा केली. त्यावर चिडलेल्या मध्य प्रदेश परिवहनच्या बसचालकाने पठाने यांच्याशी वाद घालत त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. त्यात पठाने जखमी झाले. त्यानंतर मध्य प्रदेश परिवहनच्या बसचालकाने बसस्थानकातून बस सोडून पळ काढला.
हा प्रकार एसटीच्या इतर कर्मचाऱ्यांना कळताच ते आक्रमक झाले. एसटी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी या घटनेच्या निषेधार्थ रोष व्यक्त करीत ‘चक्का जाम’ आंदोलनाला सुरुवात केली.
कारण, यापूर्वीही बसचालक व वाहकास मारहाण करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांना तत्काळ आळा घालावा, अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, एसटी कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्यात यावे आदी मागण्या कर्मचारी संघटनेच्यावतीने करण्यात आल्या. या संदर्भात कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी एसटी प्रशासनाकडे लेखी आश्वासनाची मागणी केल्याने पेच निर्माण झाला होता. त्यामुळे सायंकाळपर्यंत यावर कोणताही तोडगा न निघाल्याने सावनेर आगाराची एकही बस धावली नाही.
परिणामी, प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. (तालुका प्रतिनिधी)

पोलिसांचा हस्तक्षेप
कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे सावनेर आगाराचे दिवसभरात चार लाख रुपयांचे नुकसान झाले. आंदोलनामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता सायंकाळी पोलीस बंदोबस्तात बसेस सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, कर्मचारी मानायला तयार नव्हते. त्यामुळे पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कर्मचाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी १७ व १८ नोव्हेंबर २०१४ रोजी आंदोलन केले होते. महामंडळाने त्यांच्या दोन दिवसांच्या आंदोलनासाठी १६ दिवसांचे वेतन कापले होते. त्यामुळे आपण कुणावरही विश्वास ठेवण्यास तयार नसल्याचे कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले. कर्मचारी ज्या पद्धतीने लेखी आश्वासन मागतात, त्या पद्धतीने लेखी देण्याचे आम्हाला अधिकार नाही, अशी माहिती विभाग नियंत्रक सुधीर पंचभाई यांनी दिली.

Web Title: Savarkar 'Chakka Jam'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.