सावरकर मुद्द्यावरुन चहापानावर विरोधकांचा बहिष्कार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 12:33 AM2019-12-15T00:33:14+5:302019-12-15T00:34:40+5:30
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर देशासह राज्यातील राजकारणदेखील तापले आहे. याचे पडसाद सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात उमटणार असून पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांतर्फे आयोजित चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर देशासह राज्यातील राजकारणदेखील तापले आहे. महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये कॉंग्रेससह सहभागी असलेल्या शिवसेनेने या मुद्द्यावर मवाळ भूमिका घेतल्याने भाजपामधील नाराजी आणखी वाढली आहे. याचे पडसाद सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात उमटणार असून पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांतर्फे आयोजित चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे. यासंदर्भात रविवारी सकाळी ११ वाजता नागपुरात होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
परंपरेनुसार मुख्यमंत्री अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी व विरोधकांना चहापानासाठी आमंत्रित करतात. साधारणत: विरोधकांकडून सरकार समस्यांप्रति गंभीर नसल्याचा आरोप करत यावर बहिष्कार टाकण्यात येतो. यंदा उद्धव ठाकरे यांचे हे मुख्यमंत्री म्हणून पहिलेच अधिवेशन राहणार आहे. त्यांनी रविवारी सायंकाळी ५ वाजता ‘रामगिरी’ येथे विरोधकांना चहापानासाठी निमंत्रित केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कॉंग्रेसकडून सावरकर यांच्यासंदर्भात आलेले वक्तव्य व शिवसेनेने घेतलेली अतिशय मवाळ भूमिका यामुळे बहुतांश भाजप आमदार हे नाराज आहे. अगोदरच शिवसेनेने सत्तास्थापनेच्या वेळी तोडलेली युती व त्यात आता सावरकरांबाबतच्या वादामुळे चहापानाला जाऊ नये असे त्यांचे मत आहे. त्यामुळे रविवारच्या बैठकीकडे विरोधकांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
अद्याप अंतिम निर्णय नाही : फडणवीस
यासंदर्भात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना संपर्क केला असता अद्यापपर्यंत चहापानाबाबत अंतिम निर्णय झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रविवारच्या बैठकीत आमदारांचे मत लक्षात घेऊन याबाबत आम्ही भूमिका ठरवू, असे त्यांनी सांगितले.