पर्यावरणासाठी विजेची बचत करा
By admin | Published: March 26, 2017 01:40 AM2017-03-26T01:40:54+5:302017-03-26T01:40:54+5:30
जगभरात वाढत असलेला विजेचा वापर आणि वीजनिर्मितीसाठी वापरला जाणारा कोळसा, यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते.
अनिल सोले यांचे आवाहन : मनपा व ग्रीन व्हिजीलतर्फे ‘अर्थ अवर’
नागपूर : जगभरात वाढत असलेला विजेचा वापर आणि वीजनिर्मितीसाठी वापरला जाणारा कोळसा, यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. यावर पर्याय म्हणून आॅस्ट्रेलियात १० वर्षांपासून ‘अर्थ अवर’ हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमात भारतही सहभागी आहे. नागपूर शहरात महापालिका व ग्रीन व्हिजील संस्थेतर्फे गेल्या तीन वर्षांपासून ऊर्जा बचतीचा हा उपक्रम राबविला जात आहे. पर्यावरण व वीज बचतीसाठी केवळ एक दिवस ऊर्जा बचत न करता आपल्या दैनंदिन जीवनात विजेची बचत करा, असे आवाहन आमदार प्रा. अनिल सोले यांनी शनिवारी केले.
सोले यांच्या नेतृत्वात शनिवारी रात्री सीताबर्डी येथील इंटर्निटी मॉलमध्ये एक तास वीज बचतीचा हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. माजी महापौर प्रवीण दटके, ग्रीन व्हिजीलचे संस्थापक कौस्तुभ चॅटर्जी, मॉलचे महाप्रबंधक आशिष बारई व नगरसेविका उज्ज्वला शर्मा आदी उपस्थित होते.
एक युनिट वीज निर्माण करण्याकरिता ५०० ग्रॅम कोळसा तर ७.५ लिटर पाण्याची गरज भासते. याशिवाय यातून पृथ्वीच्या तापमानात वाढ होण्याला कारणीभूत असलेल्या कार्बनडाय आॅक्साईडचे उत्सर्जन होते. एक तास वीजदिवे बंद ठेवल्यास मोठ्या प्रमाणात वीज बचत होईल, सोबतच पर्यावरण संवर्धनाला मदत होईल. मागील तीन वर्षांत नागपूर शहरात ९३ हजार ४८८ युनिट ऊर्जा बचत करण्यात आली. यातून देशाला एक संदेश दिल्याची माहिती सोले यांनी दिली.
अनिल सोले यांच्या पुढाकाराने महापालिकेतर्फे हा उपक्रम सुरू झाला. आजवर ३६ वेळा हा उपक्रम राबविण्यात आला. ३३ हजार घरापर्यंत वीज बचतीचा हा संदेश पोहोचला असून, पुढील वर्षात ५० हजार घरापर्यंत हा संदेश पोहोचविला जाईल, असा विश्वास प्रवीण दटके यांनी व्यक्त केला.
कौस्तुभ चॅटर्जी यांनी पर्यावरण रक्षणासाठी व प्रदूषण थांबविण्यासाठी महापालिकेच्या सहकायांने हा उपक्रम नागपूर शहराच्या सर्व भागात राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली. इटर्निटी मॉलमध्ये ५० टक्के अनावश्यक दिवे बंद ठेवून ऊर्जा बचत करण्यात आली. यावेळी महापालिकेच्या विद्युत विभागातील सहायक अभियंता अजय मानकर, सलीम इकबाल, एम.एम. बेडा तसेच कनिष्ठ अभियंता, ग्रीन व्हिजीलचे स्वयंसेवक उपस्थित होते.(प्रतिनिधी)